पुसेगाव : पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या १०० जणांची कोरोना चाचणी करून घेतली, त्यापैकी पॉझिटिव्ह तिघांना येथील कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवले.
गुरुवारी येथील छत्रपती शिवाजी चौकात पुसेगाव पोलिसांनी कडक बंदोबस्तात विनाकारण फिरणारे दुचाकीस्वार, चारचाकी गाड्या अडवून संबंधितांची चौकशी सुरू केली.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीसपाटील, आरोग्य विभाग आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३७ पोलीस कर्मचाऱ्यांनी याआधीच कार्यक्षेत्रातील ४६ लहान-मोठी गावे, वाड्या-वस्त्या दत्तक घेतल्या आहेत. मात्र, कडक लॉकडाऊन केला तरीही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सचिन जगताप, किरण देशमुख, सुनील अब्दागिरी, ज्ञानेश्वर यादव, मुंढे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. यावेळी मोकाट फिरणाऱ्या १०० जणांची कोरोना चाचण्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यात पॉझिटिव्ह आलेल्या तिघांना पुसेगाव कोरोना सेंटरला पाठविण्यात आले.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पुसेगाव, खटाव, बुध, डिस्कळ, विसापूर या मोठ्या गावांसह अनेक छोटी गावे कोरोना हॉटस्पॉट ठरू लागली आहेत. अनेक ठिकाणी बाधित असूनही गृह अलगीकरणामध्ये असणारे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय बिनधास्तपणे बाहेर फिरून कोरोना सुपरस्प्रेडर म्हणून वावरत असल्याचे आढळून येत आहेत. गावोगावच्या दक्षता समित्या पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करून शाळा, मंदिरे, मंगल कार्यालयांमध्ये बाहेरून येणाऱ्या आणि बाधितांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे.
२७ पुसेगाव
फोटो : पुसेगाव पोलिसांकडून येथील छत्रपती शिवाजी चौकात मोकाट फिरणाऱ्या सुमारे १०० जणांची गुरुवारी कोरोना चाचणी करण्यात आली.