सातारा : सातारा शहरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जे विक्रेते चाचणी करणार नाहीत अशा विक्रेत्यांना व्यवसायास परवानगी दिली जाणार नसल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दररोज दीडशे ते दोनशे नवे
रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सातारा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागल्याने आता प्रशासनाने उपाययोजनांची तीव्रता अधिक तीव्र केली आहे. राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा व त्याच्याशी निगडित व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शहरातील भाजी विक्रेत्यांनादेखील व्यवसायास परवानगी दिली आहे. मात्र, मंडईमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणी केल्यानंतर येणारा रिपोर्ट विक्रेत्यांनी स्वतःजवळ ठेवणे गरजेचे आहे. जे विक्रेते चाचणी करणार नाहीत अशांना व्यवसायास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी स्वतःसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
(चौकट)
फिजिकल डिस्टन्सचे पालन करा
शहरातील मंडईत व रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांजवळ ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी सुरक्षित अंतराचे पट्टे आखावे, प्रत्येक विक्रेत्यामध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, फिजिकल डिस्टनसचे पालन न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.