फलटण : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र समोर असतानाच फलटण तालुक्यात मात्र काही गावांत सामुदायिकरीत्या रुग्ण आढळत आहेत. यामुळे तालुक्यातील काेरोनाचा धोका अद्याप संपला नसल्याचे दिसून येत आहे.
फलटण शहर आणि तालुक्यात मागील दोन महिन्यांत कोरोनाने हाहाकार माजविला होता. तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभाग, महसूल, पोलीस प्रशासनाबरोबरच आजूबाजूची गावही हादरून गेली. त्यानंतर प्रत्येक वाडीवस्तींवर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तरीही नागरिक तपासणी करायला पुढे येत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने शहरातील चौकाचौकांत पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेत भेटेल त्या प्रवाशांना थांबवून त्यांची तपासणी करण्याचा नवीन फंडा सुरू केला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रादुर्भाव फक्त शहरांपुरता मर्यादित होता. मात्र, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अधिक वाढले. यातून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कामगिरीवर चारीबाजूने टीकांचा भडीमार होताना दिसत होता. आरोग्य व्यवस्था गॅसवर असतानाही गावोगावी तरुणांनी पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष उभे केले. याचा सकारात्मक परिणाम होऊन रुग्णसंख्या कमी कमी होऊ लागली.
फलटण शहरात दररोज कोरोना चाचण्या होत आहेत. यामध्ये अत्यल्प रुग्ण सापडत आहेत. मात्र, तालुक्यातील मोजक्या गावात रुग्णसंख्या जास्त आढळू लागल्याने चिंता आहे. गावागावांत कोरोना रुग्ण असतानाही तरुणवर्ग क्रिकेट खेळताना दिसत आहे. मास्कचा वापर पण अनेकजण टाळू लागले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. प्रशासनाने उपाययोजना सुरूच ठेवल्या असल्यातरी ग्रामस्थांनीही योग्य काळजी घेण्याची गरज आहे, हेच कोरोना स्थितीवरून लक्षात येत आहे.
..............................................................