लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस होत असतानाच, शुक्रवारी धक्कादायकरीत्या दुपटीने बाधित रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. रुग्णवाढीचा दर ५.८७ टक्के इतका झालेला आहे.
आरोग्य विभागाने चाचण्या करण्यावर भर दिला असून, ४ हजार १२३ इतक्या विक्रमी कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामधून २४२ लोक बाधित आढळले आहेत. जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे यांच्यापाठोपाठ रुग्णवाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हजारांवर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गत आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांची वाढ सुरू आहे. वर्षाअखेरीस सुरू झालेली रुग्णवाढ दुपटीने होताना पाहायला मिळत आहे. ४ जानेवारीला ९८ रुग्ण आढळले होते. ५ जानेवारीला त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन १८९ रुग्ण आढळले. आता ही रुग्णवाढ कायम सुरू असून, गुरुवारी १७८ लोकांना कोरोनाची बाधा झाली, तर शुक्रवारी रुग्णसंख्येत आणखी वाढ होऊन २४२ लोक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने अजून तरी कोविड सेंटर सुरू केलेली नाहीत. जे रुग्ण आढळून येत आहेत, ते गृहविलगीकरणामध्येच उपचार घेत आहेत. रुग्णवाढ अशीच चालू राहिली, तर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तसेच येत्या दोन-तीन दिवसांमध्ये कोरोना सेंटर्सही सुरू करावी लागणार आहेत, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत.
मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईशहर व ग्रामीण भागामध्ये मास्क न वापरता फिरणारे लोक आहेत, त्यांच्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस दलातर्फे जागोजागी चेक नाके सुरू करण्यात आले असून, जे वाहनधारक तोंडाला मास्क लावत नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलेले आहे. गावामध्ये संबंधित ग्रामपंचायतीही दंडात्मक कारवाई करत आहेत