पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या लसीचे ५५० डोस कृष्णा हॉस्पिटलला उपलब्ध झाले असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. विश्वास पाटील यांना पहिली लस देण्यात आली.
यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी.डी. जॉन, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन.डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलू, नर्सिंगच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सहायक कुलसचिव एस.ए. माशाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘कृष्णा हॉस्पिटल हे कोरोनामुक्तीचे महत्त्वाचे केंद्र असून, आतापर्यंत याठिकाणी ३ हजार ३५८ कोरोनाग्रस्त रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यापैकी ३ हजार २०० हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कृष्णा हॉस्पिटल हे ‘कोविशिल्ड’ या लसीसाठीच्या संशोधनासाठीचेही एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये’, असे आवाहन यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. व्ही.सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस.आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : १६केआरडी०१
कॅप्शन :
कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, डॉ. ए.वाय. क्षीरसागर आदी उपस्थित होते.