खटाव : कोरोनाबाधित रुग्ण गृह अलगीकरणासाठी असलेले कडक नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गृह अलगीकरणमध्ये असलेल्या सर्व कोरोनाबधितांना यापुढे आयसोलेशन केंद्रात पाठविण्याबाबत शासनाचे आदेश असल्यामुळे अशा रुग्णांना आता आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
खटावमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दक्षता कमिटी, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना पाठविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, अशोक कुदळे, मंडल अधिकारी मोहन मोहिते, तलाठी धनंजय तडवळेकर, दीपक घाडगे, आरोग्यसेवक योगेश भोसले, पोलीसपाटील पवनचंद जगताप, सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.
आरोग्य विभागाकडून प्राप्त यादीनुसार खटावमध्ये गृह अलगीकरणात असणाऱ्या १९ बाधित रुग्णांना गौरीशंकर पॉलिटेक्निक स्कूलमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
ही मोहीम गावोगावी राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले यांनी सांगितले. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आयसोलेशन केंद्रात उपचार घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत आवाहन केले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीला आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांनी कोरोनाची तपासणी करून घेऊन आपले कुटुंब सुरक्षित कसे राहील, याची जबाबदारी व खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कॅप्शन : खटावमध्ये गृह अलगीकरणातील रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात हलविताना पुसेगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, आदी उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)