वाई : ‘कोरोना दक्षता कमिटीने मरगळ झटकत कामाला लागावे. मागील वर्षीप्रमाणेच गावातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून ट्रेसिंग करणे, गृहविलगीकरण करणे व शासनाच्या नियमांचे पालन या त्रिसूत्रीचा वापर करावा,’ असे आवाहन तहसीलदार रणजित भोसले यांनी केले.
पसरणी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी कोरोना कमिटीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, सरपंच हेमलता गायकवाड, उपसरपंच सुनील महांगडे, स्वप्नील गायकवाड, राजेंद्र बेलोशे, तलाठी भूषण रुकडे, ग्रामसेवक रत्नाकर गायकवाड, डॉ. पूजा किरीड, योगेश पाटील, विशाल शिर्के उपस्थित होते.
भोसले म्हणाले, ‘मागील वर्षी पसरणी कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. नियमांचे पालन करून लवकरच रुग्णांची संख्या आटोक्यात आणली. सध्या गावात चाळीस सक्रिय रुग्ण आहेत. त्यांचे कुटुंबीय व रुग्ण बाहेर समाजात मिसळणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. मिनी कंटेन्मेंट झोन बनवावेत. आशा सेविकांनी नवीन रुग्ण ट्रेसिंग करावेत. ज्यांना गृहविलगीकरणाची सोय आहे अशांना घरीच क्वारंटाइन करावे. त्यांच्यावर योग्य औषधोपचार करावेत. जे ग्रामस्थ कोरोना कमिटीचे ऐकत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. विलगीकरणाची सोय नसलेल्यांना शासकीय विलगीकरण कक्षात पाठवावे. कोणाचाही मृत्यू कोरोनामुळे होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कोरोना कमिटीची आहे.
उदयकुमार कुसूरकर यांनी कोरोना रुग्णांवर होणारे उपचार, त्यांची परस्थिती, रुग्णसंख्या वाढण्याची कारणे व त्यावर काय उपाय करावेत याविषयी मार्गदर्शन केले.
उपसरपंच महांगडे, स्वप्नील गायकवाड यांनी उपाययोजनांची माहिती दिली.
चौकट
तहसीलदार रणजित भोसले व गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर दररोज तालुक्यातील गावोगावी जाऊन दक्षता समितीच्या बैठका घेत आहेत. त्यांना मार्गदर्शन व सूचना करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा चंग बांधला आहे. यामुळे गावागावातील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. शासनाच्या सोयीसुविधांची माहिती देत कोरोना कमिटीला ग्रामस्थांना वाचविण्याचे आवाहन ते करीत आहेत.
फोटो पांडुरंग भिलारे
पाचवड ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कोरोना कमिटीतील सदस्यांना तहसीलदार रणजित भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उदयकुमार कुसूरकर, हेमलता गायकवाड उपस्थित होत्या.