सातारा : जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. सातारा तालुक्यातील ४ हजार ७०९ बाधितांपैकी तब्बल २ हजार ९१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.प्रशासनाकडून रॅपीड अॅँटीजेन टेस्ट व स्वॅबचे नमुने वाढविण्यात आल्याने कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज पाचशे ते सातशे रुग्णांची भर पडू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांनी ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचे बाब बनू लागली असली तरी दुसरीकडे कोरोनामुक्तीसाठी झटणाºया आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यशही येऊ लागले आहे.सातारा तालुक्यातील बाधितांची संंख्या ४ हजार ७०९ इतकी झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ३ हजार ६६ तर शहरी भागातील १ हजार ६४३ रुग्ण आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी तालुक्याचा रिकव्हरी रेट समाधानकारक असल्याने आतापर्यंत २ हजार ९१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळत नसल्याने तालुक्यातील ७७२ रुग्ण घरातूनच उपचार घेत आहे. गेल्या पंधरा दिवसांत गृह विलगीकरणात ७७२ रुग्णांपैकी ३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४६३ रुग्ण उपचार घेत आहेत.स्वयंसेवी संस्थांचे बळ..कोरोना बाधितांची वाढती संख्या, जिल्ह्यात उपलब्ध असलेले आॅक्सिजन बेड व अपुऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधा पाहता कोरोना बाधितांची उपचाराविना परवड सुरू होती. अशा संकटकाळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, शिक्षक संघटना मदतीसाठी पुढे धावून आल्या.
ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले. तर अनेकांनी आॅक्सिजन मशीन, थर्मल स्कॅनर, आॅक्सिमीटरची खरेदी करून ते प्रशासनाला सुपूर्द केले. प्लाझ्मा दान करण्यासाठीही आता अनेकजण पुढे सरसावू लागले आहेत. सातारकरांनी दाखविलेल्या या बांधिलकीमुळे कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार करता आले.आरोग्य यंत्रणेचा अविरत लढा...सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ज्या पटीत वाढत आहे, त्या तुलनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची मात्र मोठी कमतरता जाणवू लागली आहे. तरीदेखील जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.