सातारा : सातारा पालिकेतील आरोग्यच नव्हे तर सर्वच विभाग गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना विरुद्ध निकराचा लढा देत आहेत. न थकता, न थांबता हे कर्मचारी शहर सुरक्षित राहावं यासाठी झटत आहेत; परंतु जिल्हा प्रशासनाने पालिकेला पयार्यी व्यवस्थाच उभी न केल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचारी जर बाधित झाले तर कोरोना प्रतिबंधाचे काम करायचे कुणी? असा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता पंचवीस हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलली जात आहेत. मात्र, कोरोनाविरुद्ध लढा देणारे डॉक्टर, परिचारिका, पालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, पोलीस प्रशासन या सर्वांचीच गेल्या पाच महिन्यांपासून अक्षरश: दमछाक झाली आहे.
न थकता व न थांबता या कर्मचाऱ्यांचा कोरोना विरूध्द आरोग्यपूर्ण लढा सुरूच आहे.पालिकेतील कर्मचाºयांना स्वच्छतेपासून ते कोरोनामुळे दगावलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतची सर्व कामे करावी लागतात. हे काम अत्यंत जोखमीचे असूनही कर्मचारी ते जबाबदारीने पार पाडत आहे. वास्तविक या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांच्या कामकाजानंतर काही दिवस सुट्टी मिळणे गरजेचे आहे; परंतु तसे होताना दिसत नाही.
असे असूनही कर्मचारी, अधिकारी आपल्या कामात कोणताही खंड पडू देत नाही. पालिकेतील कोरोना, आरोग्य, पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू, शहर विकास या विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही कर्मचाऱ्यांवर उपचारही सुरू आहेत. तरीदेखील पालिका प्रशासनाचे कोरोना प्रतिबंधाचे काम अविरत सुरुच आहे.सद्य परिस्थितीत जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पालिकेपुढे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. जिल्हा प्रशासनाने पालिकेला पयार्यी व्यवस्था उभी केली असती तर कोणत्याही कर्मचाऱ्यांवर आज कामकाजाचा अतिरिक्त ताण आला नसता. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची अवस्था ''सांगताही येईना आणि सहनही होईना'' अशीच काहीशी झाली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी मोठ्या जबाबदारीने झटत आहे. प्रामुख्याने आरोग्य विभागावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. तरीदेखील आमचे अधिकारी व कर्मचारी कोरोना विरूध्द अविरत लढा देत आहेत. कर्मचाºयांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा.- अनिता घोरपडे, आरोग्य सभापती
पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सातारा शहराचा नव्हे तर जिल्ह्याचा देखील भार आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हापरिषद, पंचायत समिती, जलसंपदा आदी विभागातील कर्मचाऱ्यांवर थोड्याफार फार प्रमाणात कामाची जबाबदारी सोपविली तर पालिकेवर कामाचा भार कमी होइल.- धनंजय जांभळे, नगरसेवक