म्हसवड : प्रशासनाने म्हसवड शहरातील खासगी दवाखाने अधिग्रहन करुनही तेथे कोरोना बाधितांना दाखल करुन घेत नाहीत. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यायात, या मागण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी शनिवारी सकाळी अचानक म्हसवड आरोग्य केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले.यावेळी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध करत प्रशासनाचा धिक्कार... असो धिक्कार... अशा प्रशासनाचे करायचे काय... अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. येथील कोरोनाच्या उपचारासाठी काही दवाखाने शासनाने अधिग्रहन केली होती. पण त्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत.
जागा शिल्लक नाही अशी उत्तरे मिळत असल्याने म्हसवडकर नागरिकांनी संतप्त व्यक्त करत अचानक ठिय्या आंदोलन सुरु केले. यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली.प्रशासनाच्या कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. पंढरपूर सातारा रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू करुन प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
शासनाने म्हसवड येथील दोन रुग्णालये कोरोना बाधित रुग्णांची सोय व्हावी म्हणून अगोदरच अधिग्रहन करण्यात आली असतानाही ते दोन्ही दवाखाने रुग्णांना प्रवेश देत नव्हती. म्हणून प्रशासनाला जाग आणण्यासाठी व येथील रुग्णांना येथे गावातच उपचाराची सोय व्हावी यासाठी आंदोलन केले.यावेळी आंदोलनास तहसीलदार बाई माने यांनी भेट दिली मात्र प्रांताधिकारी आल्याशिवाय तसेच अधिग्रहन केलेले दवाखाने प्रशासनाने ताब्यात घेऊन येथील रुग्णांची सोय झाल्याशिवाय येथून उठणार नाही अशी भूमीका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यानंतर अर्धा तासाने प्रांताधिकारी आंदोलनस्थळी आल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रांताधिकारी तहसीलदार यांनी त्या अधिग्रहन केलेल्या रुग्णालयात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु करण्याबाबत चर्चा केली.प्रशासनाला म्हसवडमधील कोरोना रुग्णांबाबत गांभीर्य नसल्याने कोरोनाबाधीतांची हेळसांड सुरु होती. म्हसवडकारांनी तीन तास ठिय्या आंदोलन करुन प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत आंदोलन केल्याने प्रशासनाने कार्यतत्परता दाखवत खासगी दवाखाने अधिग्रहन केल्याने म्हसवडसह परिसरातील अनेक गावातील कोरोना बाधितांची सुरू असलेली हेळसांड थांबणार आहे.