सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आता मोठ्या शहरांप्रमाणे तीव्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरातच उपचार करावे लागतील अशी स्थिती आहे. याबाबत जिल्हा प्रशासन पातळीवरही विचार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात होम आयसोलेशनची सुरुवात लवकरच होऊ शकते.जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित होती. त्यातच कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव आटोक्यात येईल, असे वाटत होते. पण, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली.
त्यामुळे आता जुलै महिना संपत असताना रुग्णसंख्या ३ हजार २०० च्यावर गेली. तर या कोरोनामुळे ११३ जणांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तेवढी यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता यावर होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आला आहे.कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने मुंबई, पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी होम आयसोलेशनची सुरूवात झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही याची सुरुवात करण्याबाबत जिल्हा प्रशासन स्तरावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना विषाणूची कमी तीव्रता असणाऱ्या रुग्णांसाठी हा पर्याय वापरण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्णाच्या घरात होम आयसोलेशनची सोय होऊ शकते का ?. घरात कोणी काळजी घेऊ शकतो का ? याचा विचार यामध्ये होणार आहे.त्याचबरोबर एखाद्या रुग्णावर घरात उपचार सुरू असताना काही अडचण आली तर डॉक्टरांचे संपर्क क्रमांकही देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या यापुढेही मोठ्या प्रमाणात वाढत चालली तर जिल्ह्यात होम आयसोलेशनला लवकरच सुरुवात होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.साडे तीन हजारांवर बेड क्षमता...जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये काही कोरोना केअर सेंटर तसेच रुग्णालयातही हे उपचार सुरू आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात साडे तीन हजारांवर बेड क्षमता उपलब्ध आहे. येथे संशयित तसेच रुग्णांना ठेवता येते. यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत ३३ कोरोना केअर सेंटर आहेत.
याठिकाणी २ हजार ९०० बेड उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा रुग्णालया अंतर्गत डीसीएससी व डीसीएचआय प्रत्येकी सहा असून येथे ७५० हून अधिक बेड उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले.पाच दिवसांत ५६३ रुग्ण...जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून गेल्या पाच दिवसांत नवे ५६३ रुग्ण आढळून आले आहेत. तर या पाच दिवसांत २६ जणांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर वाढत असताना प्रशासन व आरोग्य यंत्रणेवरही ताण येणार आहे. याचा विचार करुनच होम आयसोलेशनचा पर्याय पुढे येत आहे.