वेळे : कोरोना परदेशातून देशात, देशातून राज्यात, राज्यातून जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून वाडीवस्तीपर्यंत पोहोचला. कोरोनावर औषध अजून तरी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. त्याला यश येत असून आॅक्सिजन यंत्र घेण्याकडे कल वाढला असून घरच्या घरीच प्रत्येकजण आॅक्सिजन लेवल तपासली जात आहे.या रोगामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्व दवाखाने खचाखच भरलेले आहेत. दवाखान्यात बेड शिल्लक नाहीत. आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवत आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. अशा सर्व प्रकारांमुळे रुग्णाला आवश्यक असणारा आॅक्सिजन गरजेनुसार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावतात.
असे घडू नये म्हणून आता बाजारात अनेक प्रकारच्या आॅक्सिजन निर्माण करणाऱ्या मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या मशीन विजेवर चालणाऱ्या असून सामान्य हवेतून आॅक्सिजन निर्माण करतात. तसेच वजनास हलक्या व आकाराने लहान असल्याने त्या कोणत्याही ठिकाणी नेता येऊ शकतात.व्हेंटिलेटरसाठी उत्तम पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. गावोगावी रुग्णांचे वाढते प्रमाण असल्याने सर्वच ठिकाणी चिंतेचे वातावरण आहे. कधी कोणते गाव पुढे निघून जाईल हे सांगणे कठीण झाले आहे. खबरदारी म्हणून आॅक्सिजन मशीन घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.
ज्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे अशा लोकांनी या मशीन व्यक्तिगतरित्या खरेदी केल्या आहेत. तसेच गावातील अनेक तरुण, मंडळे, संस्था यांनी एकत्र येत लोकसहभागातून या मशीन खरेदी केल्या आहेत. त्याचा उपयोग गावकऱ्यांना होताना दिसत आहे. अजूनही या मशीन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढल्याचा दिसत आहे.वेळ अन् खर्च वाचण्यास मदतरुग्णांना आधार ठरणाऱ्या या मशीन प्रत्येक गावात असल्यास नक्कीच फायदा होणार आहे. गरजवंताला लगेचच आॅक्सिजन मिळाल्याने त्याचा जीव वाचू शकणार आहे. शिवाय त्याचा होणारा खर्च व वेळही वाचणार आहे. तातडीने आॅक्सिजन मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात या मशीन उपलब्ध करण्यासाठी तरुण पिढी पुढे येत असल्याचे निदर्शनास येत आहे.