खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या दहा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. मात्र, सध्या केवळ २३२ रुग्ण पॉझिटिव्ह असून, यापैकी केवळ १२३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यात आजवर १८ वर्षांखालील १०४९ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही संख्या बाधितांच्या सुमारे १० टक्के असल्याने पुढील काळात मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यात झपाट्याने वाढत गेलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. प्रत्येक गावातून स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करून नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, यासाठी गावोगावी उपाययोजना केल्या. त्यामुळे रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे.
खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या १०,५४० पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्येपैकी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ९६, लोणंद केंद्राअंतर्गत ७० तर अहिरे केंद्रांतर्गत ६६ पॉझिटिव्ह संख्या आहे. यापैकी केवळ १२३ रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, तर इतर विलगीकरण कक्षात आहेत. गेल्या तीन दिवसांत बाधित संख्या चाळीसपेक्षा वाढू लागली असल्यामुळे पुन्हा सतर्क होणे गरजेचे आहे.
(चौकट)
आयसीयू सेंटरचे काम सुरू..
कोरोनाच्या पुढच्या लाटेत लहान मुलांना व लोकांना होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सुरक्षित उपचार मिळावेत, यासाठी जगताप हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड व आयसीयू सेंटर तयार करण्याचे कामही सुरू केले आहे. यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
चौकट..
माझे मूल माझी जबाबदारी शिक्षकांवर...
कोरोनाकाळात मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी सध्या तरी शाळा बंदच आहेत. परंतु त्यांचे शिक्षण चालू राहिले पाहिजे, यासाठी ‘माझे मूल माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत शिक्षकांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षक व पालक लक्ष ठेवणार आहेत, तर शिक्षणासाठी शिक्षक आठवड्यातून किमान दोन वेळा गृहभेटी देऊन शिक्षणाचा प्रवाह चालू ठेवणार आहेत.
.