सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील आशा वर्कर्सना आरोग्य विभागाने कोरोनाच्या लढ्यात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. घरोघरी जाऊन जिल्ह्याबाहेरुन आलेल्या लोकांची नाव नोंदणी करण्याच्या त्यांना सूचना आहेत; परंतु आरोग्य विभागाने त्यांना ना मास्क दिलेय...ना सॅनिटायझर...ना हॅण्डग्लोज पुरविले. तरीही या आशा आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत.कोरोनाची व्याधी ही आंतरराष्ट्रीय आपत्ती ठरलीय. भारतवासीय अत्यंत ताकदीने या संकटाचा सामना करत आहेत. साताऱ्याचे जिल्हा प्रशासन तर योग्य नियोजन करुन या संकटाचा सामना करण्यात गुंतलेले आहे. आता आरोग्य विभागाने आशा वर्कर्सनाही प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन सर्व्हेच्या सूचना केलेल्या आहेत.कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. होम कोरंटाईनवर २१७ जण निरिक्षणाखाली आहेत. तर परदेशातून साताऱ्यात परतलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. कोरोनाचा हाहाकार माजल्याने मुंबई, पुण्यात राहणाऱ्या सातारकरांना मायभूमीची आस लागली अन लोंढेच्या लोंढे सातारकडे परतले आहेत. जोपर्यंत जिल्हाबंदी लागू नव्हती, तसेच संचारंबदीही नव्हती, तेवढ्या वेळेत अनेक जण आपापल्या गावातील घरी परतले.आता खरी परीक्षा सर्वांसमोर आहे. ताप, खोकला, सर्दी, घशात खवखव अशी कोरोनाची लक्षणे आहेत. काही जणांना संसर्ग झाला तरी त्याची लक्षणे दिसायला वेळ लागतो. आता आशा वर्कर्स तसेच प्रत्येक गावातील पोलीस पाटलांना जिल्ह्याबाहेरुन आलेल्या मंडळींची नोंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याने हे कर्मचारी कामाला लागले आहेत.आशा काय किंवा पोलीस पाटील काय हे दोघे घटकही अल्प मानधनावर सेवा बजावत असतात. आशा वर्कर्सना तर अवघे दीड हजार रुपये इतके कमी मानधन आहे. त्यातून कोरोनाच्या कामात गुंतवले गेलेय.
हे काम करायलाही त्या तयार असल्या तरी त्यांना मास्कू, सॅनिटायझर किंवा हॅण्डग्लोज हे शासनाने पुरविणे क्रमप्राप्त होते, आरोग्य विभागाने त्याबाबत आधीच तजवीज करायला हवी, मात्र तशी तजवीज केलेली नसल्याने अनेक आशा वर्कर्सनी स्वत: या वस्तू खरेदी करुन कामाला सुरुवात केलीय. तर ज्यांनी आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार केली, त्यांना कामावरुन काढून टाकण्याची तंबी आरोग्य विभागातील काही झारीतील शुक्राचार्य देत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आहे.
- जिल्ह्यात एकूण २६00 आशा वर्कर्स
- महाराष्ट्रात एकूण ५७000 आशा वर्कर्स
- जिल्ह्यात गटप्रवर्तक १३0
- एक हजार लोकसंख्येमागे १ आशा
आरोग्य विभागाने आशा वर्कर्सना सर्व्हे करा...अशा सूचना केलेल्या नाहीत. तर गावामध्ये जो कोणी व्यक्ती बाहेर गावाहून येतो, त्याच्यावर लक्ष ठेवून त्याची माहिती आरोग्य विभागाला कळविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा आहे. साबणाने स्वच्छ हात वारंवार धुणे, हा कोरोना विरोधात लढण्याचा उपाय आहे. कुणीही गैरसमज करुन घेऊ नये.- डॉ. अनिरुध्द आठल्येजिल्हा आरोग्य अधिकारी
आरोग्य विभाग हा अनेक गोष्टींच्याबाबतीत आशा वर्कर्सवर अवलंबून राहत आहे. विशेष म्हणजे आशा या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत असल्या तरी त्यांना योग्य ती सुविधा पुरवणे आवश्यक आहे. प्रत्येक घरात जाऊन जिल्ह्याबाहेरुन आलेल्या व्यक्तिंची नोंद करत असताना आशांनाही संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हे आरोग्य विभागाच्या लक्षात आले नाही का? त्यांना सॅनिटायझर व मास्क तसेच हॅण्डग्लोज या वस्तू शासकीय पातळीवरुन मिळणे आवश्यक आहे.- आनंदी अवघडे, राज्य अध्यक्षामहाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन