सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साताऱ्यातील अत्यावश्यक सेवा वळगता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तरीही रस्त्यावरून फेरफटका मारणाऱ्या अतिउत्साही दुचाकीचालकांना मंगळवारी सकाळी पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात आला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोना संशयीत दोन रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली असून, सातारा जिल्ह्यातही याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.सातारा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील प्रमुख मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, रस्त्यावरून फेरफटका मारणाऱ्या काही दुचाकीचालकांचा पोलिसांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.
सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर अतिउत्साही दुचाकीस्वारांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात आला. सातारा पालिकेच्या वतीने घर-टू-घर सर्व्हे सुरू करण्यात आला असून, सुरक्षिततेसाठी अग्निशमन बंबाद्वारे शहरात सोडियम हायपोक्लोराईड या जंतूनाशक औषधांची फवारणी केली जात आहे.