सचिन मंगरुळे म्हसवड : एकीकडे कोरोना संकटकाळ सुरू असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ठप्प झाली. त्यातच शासनाने शिक्षकांच्या जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर नियुक्त्या केल्या.
आपली कोरोना ड्युटी सांभाळत वाघमोडेवाडी (ता.माण) येथील मुख्याध्यापक प्रवीण जोशी यांनी शिक्षणात खंड पडून न देता दैनंदिन आॅनलाईन अध्ययन यू ट्यूबच्या आॅनलाईन एज्युकेशन या चॅनेलच्या माध्यमातून सुरू ठेवले.त्यांच्या या कार्याबद्दल शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. जोशी गुरुजींची आॅनलाईन पाठशाळा हा चर्चेचा विषय झाला आहे. या पाठशाळेचा लाभ माण तालुक्यासह इतर जिल्ह्यातील मुलांना होत आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सतत नाविन्यपूर्ण उपक्रमात आघाडीवर असते.पर्यावरणपूरक उपक्रम, क्रीडा, ज्ञान रचनावादी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया राबवत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणारी शाळा म्हणून शाळेने नावलौकिक मिळवला आहे. ही द्विशिक्षकी शाळा आहे. विनायक पानसांडे व प्रवीण जोशी यांनी विद्यार्थी व पालकांच्या मनात स्थान मिळवले आहे.विशेष म्हणजे कोणतीही आधुनिक उपकरणे नसताना एका दहा बाय दहाच्या खोलीत डब्यावर डबे ठेवून पिठाच्या डब्यावर मोबाईल ठेवून व्हिडीओ तयार करतात. ते यू ट्यूबवर अपलोड करत आहेत. विद्यार्थी व पालकांना हे व्हीडिओ आवडत असल्याने जोशी गुरुजींनी आपला हा प्रयत्न सुरू ठेवला असून पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण होत आला आहे. पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख नारायण आवळे यांनी आॅनलाईन पाठ घेण्याबाबत जोशी यांना मार्गदर्शन केले.माहिती अधिकार आणि कायद्याची माहितीहीकोरोना संकटकाळात साथरोग प्रतिबंध कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४, भारतीय दंड संहिता कलम १८८, माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करत या कायद्याबाबत पाच भाग जोशी गुरुजींनी अपलोड केले आहेत. हे सर्व पालकांसाठीही आवश्यक असल्याने त्यांच्याकडे एक समाजाभिमुख शिक्षक म्हणून पाहिले जात आहे.
शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहावे या भूमिकेतून प्रयत्न केला. मुलांना जास्त वेळ मोबाईल पाहायला लागू नये यासाठी मर्यादित वेळेत अध्यापन केले.- प्रवीण जोशी, मुख्याध्यापक