सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला. सातारा शहरामध्ये बहुतांश नागरिक रस्त्यावर न येता घरीच बसून राहिल्याने रस्ते ओस आणि घरे गजबजलेली, असे चित्र पाहायला मिळाले.रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी आठवडाभर लोक प्लॅनिंग करत असतात आणि सकाळीच नागरिक गाडी काढून बाहेर पडतात. अनेकांना आठवडाभर घरातील खरेदीसाठी वेळ मिळत नसतो, त्यामुळे राखून ठेवलेल्या रविवारच्या दिवशी साहित्य खरेदीसाठी लोक बाहेर पडतात. आज मात्र याउलट चित्र पाहायला मिळाले.
शहरातील सर्वच दुकाने रविवारी बंद ठेवण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी शनिवारीच लोकांनी करून ठेवली होती. तर फिरायला जाण्याचे डेस्टिनेशन रद्द करून अनेकांनी घरातच सुटी एन्जॉय करण्याचे बेत आखले.कित्येक दिवस मुलांसोबत न खेळलेले पालक आज उत्साहाने मुलांसोबत खेळताना पाहायला मिळाले. कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, पत्ते असे खेळ सुरू झाले. खेळताना मुलांमध्ये होणारी वादावादी सोडवताना पालकांची पुरतीच दमछाक झाली.अनेक घरांमध्ये सकाळपासूनच टीव्ही सुरू होते. न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यासह राज्य तसेच जगभरातील कोरोनाग्रस्त परिस्थितीचा अंदाज लोक घेत होते. परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याने अनेकांनी काळजी घेण्यावर भर दिला.
पालक मुलांना स्वच्छतेबाबत जागृत करताना दिसत होते. अनेकांनी टीव्हीवर लागणाऱ्या मालिका, चित्रपटांचाही आनंद घेतला. अनेक पालकांना घरात बांधून ठेवल्यासारखे वाटले; परंतु मुलांनी त्यांना विविध शक्कल लढवून घरातच थांबवून ठेवले.दरम्यान, सातारा शहरातील नेहमी गजबजलेल्या राजवाडा, मध्यवर्ती बसस्थानक, मोती चौक, पोवई नाका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गोडोली चौक, राधिका रस्ता, राजपथ, कर्मवीर पथ, तहसील कार्यालयाचा परिसर, जिल्हा परिषद चौक, शहरातील विविध महाविद्यालये, शाळा तसेच सर्वच भाजी मंडईमध्ये रविवारी चिडीचूप वातावरण होते.
कुरणेश्वर, यवतेश्वर, कोटेश्वर, ढोल्या गणपती आदी मंदिरांमध्येही भाविकच नव्हते. शहरात वाहनांची चाके थांबल्याने चिमणीपाखरांच्या आवाजासह बारीक-सारीक आवाजही स्पष्टपणे कानावर येत होते. नेहमीप्रमाणे दिसणारी लगबग तसेच कामाचा ताणतणावही दूर झाल्याने सातारकरांचा रविवार अगदीच आरामात गेला.ये जिंदगी ना मिलेगी दोबारासातारा शहरवासीयांनी अत्यंत काळजीने आणि विवेकी विचारातून रविवारचा दिवस घरात बसूनच काढला. तुमच्या हाकेला साथ दिली. कुणीही अडेलतट्टूपणा करताना पाहायला मिळाले नाही. परंतु पुणे-मुंबईवरून आलेल्या अनेक लोकांनी गावामध्ये पोलीस पाटील किंवा नगरपालिकेच्या ठिकाणी अद्यापही नोंद केलेली दिसत नाही. त्यामुळे कोरोना साताऱ्यातही वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होताना दिसते. ये जिंदगी ना मिलेगी दोबारा, असे सातारकर प्रशासनाला साथीत दिसले तरी काही अतिशहाणी मंडळी जी प्रशासनाला साथ देताना दिसत नाहीत, अशा लोकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणे आवश्यक आहे.