महाबळेश्वर : रांजणवाडी येथील कोरोना रुग्णांना उपचारासाठी नेण्यासाठी आलेल्या पथकावर रुग्णांचे नातेवाईक व इतरांनी दगडफेक करून हल्ला केला. यात वाहनाचे नुकसान झाले. घटनास्थळावर पळ काढल्यामुळे पालिका अधिकारी, आरोग्य कर्मचारी वाचले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, शहरापासून दोन किलोमीटरवर रांजणवाडी हा वसाहत आहे. तेथील लहान मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास वसाहतीमधील दोन पालिका कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. त्यानंतर एका गरोदर महिलेलाही बाधा झाली. रांजणवाडी भागात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढू लागल्याने उपविभागीय अधिकारी संगीता राजापुरे यांनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.
पालिकेने आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. हा भाग सील केला. या भागात प्रवेश करणे व बाहेर पडणे प्रतिबंधित केले. यावरून रांजणवाडीतील लोकांमध्ये नाराजी पसरली. अशातच रांजणवाडी भागातील रहिवाशांच्या सोयीसाठी गुरुवारी पालिका व ग्रामीण रुग्णालयातर्फे रॅपिड अँटीजन टेस्टसाठी शिबिर घेतले होते. शिबिरात ४६ जणांची टेस्ट घेण्यात आली.
गरोदर महिलेसह सातजणांचा अहवाल बाधित आला. दोन गरोदर महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उरलेल्या रुग्णांना नेण्यासाठी पलिकेचे आरोग्य अधिकारी त्यांचे सहकारी रांजणवाडी येथे गुरुवारी रात्री वाहनांचा ताफा घेऊन पोहोचले. या रुग्णांनाबरोबर घेऊन जाण्यास येथील लोकांनी विरोध केला.
पथकाबरोबर स्थानिक लोकांची बाचाबाची सुरू झाली. तेथे मोठा जमाव जमला. परिस्थिती तणावपूर्ण झाली. आम्हाला बरोबर घेऊन जा. आमच्यावर येथेच उपचार करा. आम्ही रुग्णालयात येणार नाही. संपूर्ण गावच क्वारंटाईन करा, अशा मागण्या रांजणवाडी येथील रहिवाशांनी केल्या. काही तरुणांनी घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव वाढला.
जमाव पथकातील अधिकाऱ्यांवर येऊ लागल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन परत फिरण्याचा निर्णय घेतला. पथक परत फिरताना जमावाने दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरू होताच एकच धावपळ सुरू झाली.
एका वाहनात मुख्याधिकारी, डॉक्टर व काही कर्मचारी पटापट बसले. त्यांनी तेथून पळ काढला. या धावपळीत पालिकेचे अभियंता सस्ते यांचे वाहन तेथेच राहीले. हे वाहन जमावाने लक्ष केले. जमावाने वाहनाची तोडफोड केली. अनेकांनी जंगलात धूम ठोकली.