लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासन व आरोग्य विभाग सक्षमपणे काम करीत आहे. असे असले तरी नागरिकांमध्ये अजूनही कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम व्यापक स्वरूपात राबवावी. त्यात कोणतीही कसूर ठेवू नये, अशा सूचना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केल्या.
शहरातील कोरोना परिस्थिती, आरोग्य व कोरोना विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या उपायोजना, लसीकरण, आदींचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात शुक्रवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य सभापती अनिता घोरपडे, आरोग्य विभागप्रमुख सुहास पवार, कोरोना विभागप्रमुख प्रणव पवार, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ. दीपक थोरात, डॉ. रोहिणी सुर्वे, नगराध्यक्ष यांचे स्वीय सहायक अतुल दिसले, आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेते, दुकानदार, व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीत काही व्यापाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून चाचणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे. नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती आरोग्य व कोरोना विभागाकडून देण्यात आले, तर पालिकेच्या कस्तुरबा व गोडोली येथील रुग्णालयात लसीकरण नियोजनबद्ध सुरू असून, नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.
शहरात कोरोनाची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करावी. शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना द्याव्यात. गरज भासल्यास पोलीस प्रशासनाचीदेखील मदत घ्यावी. दि. ५ एप्रिलपासून शहरात जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी अधिकाऱ्यांना केल्या.