वेळे {सातारा} - वाई तालुक्यातील महामार्गावर असणाऱ्या वेळे गावातील एक 65 वर्षीय पुरुष उपचारांसाठी मुंबईला पोहोचला असता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वाई तालुक्यात थोडं भीतीचं वातावरण आहे. मात्र, प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेत, गावकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आणि अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.सदर कोरोनाबाधित व्यक्ती ही मुंबईहून मार्च महिन्यात शेतीकामासाठी आली होती. गावी आल्यानंतर त्यांना थोडा थकवा जाणवू लागल्याने ते वेळे येथील एका खाजगी दवाखान्यात गेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर व्यक्तीला सातारा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर डिस्चार्ज घेऊन सदर व्यक्ती चींचनेर वंदन येथे जाऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा सातारा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल झाली.
सदर व्यक्तीचे कुटुंब हे मुंबईला असल्या कारणाने त्यांची सेवा सुश्रुषा व्यवस्थित व्हावी यासाठी सदर बाधित व्यक्तीला सातारा येथून मुंबईला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. त्याबाबत रीतसर परवानगी बाधिताच्या कुटुंबाने घेतली होती. मुंबईला गेल्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अखेर 3 मे रोजी त्यांचा अहवाल प्राप्त झाला. ते कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे वाईचे तहसीलदार रणजित भोसले, भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शाम बुवा, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी तात्काळ वेळे गावात धाव घेतली. यावेळी या कोरोना बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या चार लोकांना वाई येथील किसनवीर महाविद्यालय येथे क्वारंटाइन करण्यात आले. तसेच प्रांताधिकारी यांचे आदेशानुसार वेळे गावच्या परिघातील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. तसेच सात किलोमीटर अंतरातील परिसरही सील करण्यात येणार आहे.या परिसरात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी कडक करण्यात आली. जो कोणी या आदेशाचा भंग करेल त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी विनंती प्रशासनामार्फत करण्यात आली.
वाई तालुक्यात कोणीही कोरोना बाधित नाही
वेळे (ता. वाई) येथील व्यक्ती मुंबईत करोना बाधित आढळून आल्याने वेळे येथे कँटोमेन्ट व बफर झोन जाहीर करण्यात आला असून परिसरातील ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
वेळे गावामधील ६५ वर्षीय ग्रामस्थ गावी शेती कामासाठी ३ मार्च रोजी आले होते. त्यांना मेंदूज्वराचा आजार झाल्याने सातारा येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने २४ एप्रिल रोजी त्यांना मुंबईला हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज सदर रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले. तसे सातारा प्रशासनाला कळविण्यात त्यामुळे वेळे येथील तीन किलोमीटर भागात कँटोमेन्ट झोन व सात किलोमीटर भागात बफर झोन करण्यात आला आहे. तशी अधिसूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी काढली असल्याची माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली. वाई तालुक्यात अद्याप कोणीही करोना बाधित नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव यांनी केले आहे.