मलकापूर: मलकापूर शहरात दहा दिवसांत १६० रुग्णांची तर कऱ्हाड तालुक्यात २ हजार ७१० नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्णवाढीने मलकापुरात अडीच हजारांचा तर कऱ्हाड तालुक्याने तीस हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा मलकापुरात २ हजार ५७७ तर कऱ्हाड तालुक्यात ३० हजार ५८८ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या दहा दिवसांपासून कऱ्हाड तालुक्यातील रुग्णवाढ दररोज तीनशेच्या पुढे होत आहे. ही वाढती आकडेवारी चिंताजनक असून, हा कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा परिणाम हळूहळू दिसत आहे.
कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. गेली दहा दिवस सलग तीनशेपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आल्याने तालुका हादरला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना प्रशासन व आरोग्य विभागाकडून गांभीर्याने खबरदारीचे उपाय राबविले जात नसल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. दिवसेंदिवस आणखी नवीन रुग्णांची भर पडत आहे. एका बाजूला कऱ्हाड तालुक्यात ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तर मलकापूर शहरात नव्या रुग्णवाढीचे प्रमाण कमी असले तरी थांबलेले नाही. सरासरी दिवसाला पंधरा ते अठरा नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे एकूण शहरात २ हजार ५७७ जण बाधित झाले आहेत. बाधितांपैकी २ हजार ३६८ जणांनी कोरोनावर मात केली असून, ७१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १३८ जण सध्या विविध रुग्णालयांसह विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. कऱ्हाड तालुक्यात ३० हजार ३७९ बाधित सापडले आहेत. बाधितांपैकी आत्तापर्यंत ९१४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कऱ्हाड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय बाधितांची आकडेवारी पाहता कऱ्हाडसह आटके, काले, वडगाव हवेली, रेठरे बुद्रूक गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कृष्णाकाठी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, हा कृष्णा कारखाना निवडणुकीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
(चौकट)
कऱ्हाड तालुक्यात वाढतेय मृत्युसंख्या..
कऱ्हाड तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचा कहर सुरू असून, ९ दिवसांत तब्बल २ हजार ७१० तर गेल्या दोन दिवसांत ६७७ नवे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांच्या मृत्युदरातही कऱ्हाड पुढे असून, आतापर्यंत ९१४ जणांचा मृत्यूू झाला आहे. १ ते ९ जुलैपर्यंत तालुक्यात सर्वाधिक ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १ जुलै ११ तर ६ जुलै रोजी तालुक्यात सर्वाधिक १२ रुग्णांचा मृत्यू झाला.
(चौकट)
मलकापुरात सक्रिय रुग्ण पुन्हा शंभरी पार
एकूण- २५७७, मृत्यू - ७१, डिस्चार्ज - २३६८, उपचारार्थ - १३८, त्यापैकी रुग्णालयात - ३३, गृहविलगीकरण - ८२, विलगीकरणात २३.
फोटो: १०मलकापूर
पालिकेसह पोलीस प्रशासनाने अनेकवेळा सूचना देऊनही आगाशिवनगरात दुपारी दोन वाजेपर्यंत भाजी विक्रेत्यासह खरेदीदाराचा बाजार भरलेला असतो. (छाया : माणिक डोंगरे)
100721\img_20210710_175231.jpg
फोटो कॕप्शन
पालिकेसह पोलिस प्रशासनाने अनेकवेळा सुचना देऊनही आगाशिवनगरात दुपारी दोन वाजेपर्यंत भाजी विक्रेत्यासह खरेदीदाराचा बाजार भरलेला असतो. (छाया- माणिक डोंगरे)