कोरोना गेल्याच्या आविर्भावात पाटण शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांकडून बेफिकिरीचे प्रमाण वाढताना दिसते आहे. तालुका प्रशासन आणि नगरपंचायतीच्या वतीने दिलेल्या सूचनांची आणि नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत. तसेच काळजी घेतली जात आहे. मात्र, त्याला नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
कोरोना महामारीने उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाचा कहर वाढत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना संसर्ग दोन महिन्यांपूर्वी कमी झाला होता. परिणामी, हळूहळू बाजारपेठ, शाळा, कॉलेज सुरू करण्यात आले. आठवडी बाजार, विवाह समारंभ, एसटी आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, नियमात शिथिलता येताच नागरिक कोरोना हद्दपार झाल्याच्या आविर्भावात फिरत होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर बंद झाला. तसेच सॅनिटायझरही अनेकांनी हद्दपार केले. त्यामुळे परिस्थिती बदलली आणि पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कोरोनाचा कहर वाढतच आहे. कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर नागरिकांनी स्वत:ला काही नियम लावून घेणे गरजेचे बनले आहे.
- चौकट
लॉकडाऊन... नको रे बाबा!
नागरिकांनी स्वत:सह कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नये. स्वत: सुरक्षित राहून कुटुंब सुरक्षित ठेवावे. प्रशासनाला सहकार्य करावे. पुन्हा लॉकडाऊन कोणालाच परवडणार नाही. त्यामुळे नियमांचे पालन करीत प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.