चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील धायटी व माजगाव या दोन गावांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चाफळ विभागात कोरोना संक्रमणाचा विळखा वाढू लागल्याने ही बाब विचार करायला लावणारी ठरली आहे. नाशिक कुंभमेळा ते माजगाव व्हाया धायटी असा कोरोनाने शिरकाव केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.
धायटी गावात गुरुवारी अकरा व माजगावमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. शनिवारी पुन्हा धायटी गावात नव्याने १६ जणांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. यातील ९ जण बाधित आढळल्याने धायटीकरांची धास्ती वाढली आहे. दुर्गम व डोंगर दऱ्यामध्ये विखुरलेल्या चाफळ विभागात २२ गावे व लहान-मोठ्या मिळून एकूण पन्नास वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. विभागातील या पन्नास वाड्या-वस्त्यांवरील सात गावात आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. यातील माजगाव व धायटी ही दोन गावे कोरोनाची ‘हाॅटस्पाॅट’ ठरली आहेत. यावर्षी विभागातील सडावाघापूर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक कुंभमेळा ते माजगाव प्रवास केल्याने माजगावात कोरोना पसरल्याची चर्चा गावात सुरु आहे. माजगावात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आज तब्बल सात गावे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. यातील धायटी गाव सध्या कोरोनामुळे बेजार झाले आहे. धायटी गावात एक विधी पार पडला होता, यासाठी बाहेरुन एक व्यक्ती गावात आली होती. यानंतर येथील काही लोकांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या, त्यात अकरा जण व माजगावातील दोन असे एकूण १३ जण गुरुवारी बाधित आढळले होते. यानंतर शनिवारी पुन्हा बाधितांमध्ये ९ जणांची भर पडल्याने विभागाचा आकडा ४१वर पोहोचला आहे. यामुळे संपूर्ण चाफळ विभाग हादरुन गेला आहे.
(चौकट)
बाधित असे...
माजगाव विभागात माजगाव १६, जाधववाडी १, प्राथमिक आरोग्य केंद्र (चाफळ) २, कडववाडी १, बाबरवाडी २, सडावाघापूर १, धायटी २० असे एकूण ४१ जण बाधित आढळले आहेत.
(चौकट)
धास्ती वाढली...
धायटीचे सरपंच संजय देशमुख यांनी पुढाकार घेत स्वत: गावात औषध फवारणी केली तसेच बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी विनवणी केली. मात्र, रुग्ण काही केल्या ऐकण्यास तयार होत नाहीत. माजगावमधील काहीजणांनी कोरोनावर मात केली असली तरी धायटीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने धायटीकरांची धास्ती वाढली आहे.