कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक होते. कोरोनाची साखळी कशी तोडवी, यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रयत्न करत होते. त्यांच्या मदतीला कोपर्डेकर कोविड योद्धा व्हॉट्सॲप ग्रुप धावून आला अन् कोरोनाची साखळी तोडण्यास यश मिळाले. गेल्या दोन दिवसांत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याने कोपर्डेकरांना माेठा दिलासा मिळाला आहे.
कोपर्डेकर कोविड योद्धे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये युवा मंच पुणे, गावातील युवक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, मेडिकल आदी क्षेत्रातील नागरिकांचा सामावेश आहे. गेल्या वीस दिवसांपासून हा ग्रुप वेगवेगळ्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करत होता. नियोजन पद्धतीने ग्रुपचे काज सुरू होते. गोरगरीब गरजू रुग्णांसाठी कोविड मदत फंडासाठी मदत उभारली जात असून अनेक ग्रामस्थ याला हातभार लावत आहेत.
जमा झालेल्या पैशातून चार ऑक्सिजन मशीन खरेदी करण्यात आल्या. या मशीन रुग्णांना गरजेनुसार पुरविण्यात आल्या. दरोरोज रात्री नऊ वाजता ऑनलाइन मिटिंगद्वारे गावातील कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा घेण्यात आला. किशोर साळवे हा कोरोना योद्धा गावातील रुग्णांना तपासणी, औषध उपचारसाठी घेऊन जातो. ग्रामस्थ व तरुणांनी कोरोना प्रतिबंधासाठी सुरू केेलेल्या लढ्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गावात एकही कोरोना रुग्ण आढळून न आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या गावातील पंधरा रुग्ण कोविड सेंटर, खासगी दवाखाने आणि होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
( चौकट)
साखळी तोडण्यास असे मिळाले यश
गावात पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू घरोघरी जाऊन जागृती, तपासणी करण्यासाठी तरुणांची ढाल, मास्क वापरण्याची सक्ती, कोरोनाबाधितांना अत्यावश्यक सेवा घरपोच, ध्वनिक्षेपकावरून जनजागृती असे विविध उपाय राबविण्यात आल्याने कोपर्डे हवेलीत कोरोनाचा विळखा आता सुटू लागला आहे.
(फोटो)
कोपर्डे हवेली येथील कोरोना रुग्णासाठी चारचाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील किशोर साळवे हा तरुण या वाहनाचे सारथ्य करत असतो.
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी