विद्यानगर येथे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. घरापासून दूर असल्याने जेवणासाठी ते खानावळीवरच अवलंबून असतात. सकाळी डबा घेऊन जाणारे विद्यार्थी सायंकाळी खानावळीत जेवण घेणे पसंत करतात. गरम जेवण मिळते म्हणून ते कोरोनाचा कसलाही विचार न करता आपले आरोग्य धोक्यात घालत आहेत. अतिशय लहानशा जागेत या खानावळी चालवल्या जात आहेत. एका टेबलवर दहाजण जेवायला बसतात. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर दिले जात नाही. ग्लास व पाण्याचा जग सर्वजण हाताळतात. मास्कचा वापर होत नाही.
सध्या कोरोना वेगाने पसरत आहे. विद्यानगरीतही काही रुग्ण आढळले आहेत. याठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तर ही जागा कोरोना पसरवणारी ठिकाणे बनतील. येथे जेवताना काळजी घेतली जावी आणि कोरोना काळात डबा घेऊन जाण्यासच प्राधान्य देण्यात यावे. जेवण आवश्यक आहेच; मात्र जीवनही अनमोल आहे, याचा विचार सर्वांनीच करणे गरजेचे आहे.