दहिवडी : माण तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी आलेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार माण तालुक्यात ११५ जणांचे अहवाल बाधित आले आहेत. या आठवड्यात ८७० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजअखेर तालुक्याची बाधितांची संख्या ही ४८८६ वर गेली असून, आतापर्यंत ३६७६ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे तर १०७९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून आजअखेर १४१ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने कडक निर्बंध करीत निमावली जाहीर केली आहे. तसेच विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस तसेच नगरपंचायत यांच्यामार्फत कारवाई करण्यात येत आहे. मध्यंतरी मंदावलेला कोरोना संक्रमणाचा वेग आता पुन्हा वाढताना दिसत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सामाजिक अंतर पाळावे, शासनाने कोरोनाचे घालून दिलेले नियम काटेकोरपणे पालन करावेत. कोरोनाचे संक्रमण रोखावे व आपला बचाव करावा, त्यातून जर काही कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य विभागात जाऊन तत्काळ तपासणी करून घ्यावी. सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून, यामध्ये ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील दहिवडी ग्रामीण रुग्णालय तसेच मार्डी, मलवडी, पुळकोटी, म्हसवड, पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सहा ठिकाणी कोविशिल्ड लसीकरण मोहीम सुरू असून, प्रत्येक ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी व चार आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी लसीकरणाला जाण्यापूर्वी सेल्फ रजिस्ट्रेशन, आरोग्य सेतू ॲप किंवा ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रावर नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन करीत, स्थानिक पातळीवर राजकीय, सामाजिक, शासकीय यंत्रणेमुळे नागरिकांत जागृती होत आहे, असे तालुका आरोग्य तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांनी सांगितले.
(चौकट)
आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवस-रात्र मेहनत..
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी माण तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, माण तालुक्यात वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता वाढत्या कोरोना संक्रमणास रोखण्याकरिता कोरोना योद्धे अहोरात्र मेहनत घेत असून, आरोग्य विभागाकडून माण आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका यांची पथके तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला आहे, त्या घरातील तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
(चौकट)
अखेर २५६९४ नागरिकांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाअंतर्गत माण तालुक्यात कोविशिल्ड लसीकरण मोहीम सुरू आहे. तालुक्यात दहिवडी ग्रामीण रुग्णालय तसेच मार्डी, मलवडी, पुळकोटी, म्हसवड, पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सहा ठिकाणी कोविशिल्ड लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत तालुक्यातील २५६९४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये कोविड योद्धे व ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस व दुसरा डोस असे मिळून एकूण २५६९४ लसीकरण झाले आहे.
21दहिवडी
फोटो- माण तालुक्यातील मलवडी येथील बाजारपेठ गेल्या पाच दिवसांपासून कडकडीत बंद आहे.