कोरोना संक्रमण वेगाने वाढत असून, बहुतांश गावे सध्या बाधित आहेत. काही गावांमधील परिस्थिती तर चिंताजनक आहे. अपवाद वगळता प्रत्येक गावात सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत. बहुतांश रुग्ण ‘होम आयसोलेट’ असले, तरी त्रास होत असलेल्या रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्डात काम करणारे डॉक्टर तसेच कर्मचारी खबरदारी घेतात. मात्र, वारंवार बाधितांच्या संपर्कात राहिल्याने त्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा जास्त धोका असतो. सध्या कऱ्हाडातील काही रुग्णालयांमधील डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांसह काही कर्मचारीही कोरोनाचा सामना करीत असून, काहींना तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
मुळातच कोरोना वॉर्डमध्ये काम करण्यास डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यातच उपलब्ध असलेले डॉक्टर व कर्मचारीही बाधित होत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे संपुर्ण कुटुंबच अॅडमिट करण्याची वेळ आली आहे.
- चौकट
उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा शिरकाव
कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील पाच नर्ससह अन्य दोन कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची घटना गतवर्षी घडली होती. त्यावेळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सध्याही हीच स्थिती असून, रुग्णालयातील एका डॉक्टरांसह अन्य दोन कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासन काळजीत पडले आहे. एका कर्मचाऱ्याच्या पत्नीसह मुलीलाही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.