सातारा : कोरोनाकाळाने गेल्या दीड वर्षात सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडवून टाकली आहेत. अर्थचक्र स्थिर व्हायला अजून किती अवधी लागेल याचा अंदाज कोणालाही नाही. त्यामुळे हाती येणाऱ्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च आणि भविष्यासाठी बचत करण्याची कसरत करावी लागत आहे. उपलब्ध उत्पन्नात कोरोनाने आर्थिक शिस्तीचे धडे दिल्याने कुटुंबातील अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे बंदची परिस्थिती होती. या काळात वाहतूक, कार्यालये, बाजारपेठा, उद्योगधंदे सर्व काही ठप्प होते. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय आर्थिक अडचणीत आले, तर अनेकांना निम्म्या पगारातच काम करावे लागले. मागील वर्षभरापासून नागरिक मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. सामान्य दिवसांमध्ये अनावश्यक केले जाणारे खर्च टाळून अनेकांनी उपलब्ध उत्पन्नात उत्तम राहण्याचाही प्रयत्न केला.
चौकट
कुठे कुठे केली जातेय बचत?
लॉकडाऊनमुळे कुठेही बाहेर पडायचे नाही म्हणून नवीन कपडे नाहीत
सगळ्या बातम्या आणि मालिका मोबाइलवर दिसतात तर केबल नको
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भाज्यांचे दर लक्षात घेता एक दिवसाआड पालेभाजी
पूर्णवेळ घरात राहत असल्याने नैसर्गिक साधनांचा वापर करून सौंदर्य खुलविणे
प्रत्येकाला स्वतंत्र इंटरनेट घेण्यापेक्षा घरात वायफाय उपलब्ध करून घेणे
कोरोनावर मात करायला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर बाहेरचे खाणे बंद
कोट :
कोरोनाकाळाने आपल्याला प्रत्येक पातळीवरच मर्यादेत राहण्याचा संदेश दिला आहे. आम्ही पहिल्यापासूनच मर्यादित खर्च करत होतो. या काळात आऊटिंग, हॉटेलिंग आणि शॉपिंग या सर्वांवरच कटाक्षाने मर्यादा घालून घेतल्या. परिणामी कोरोनाकाळात घटलेल्या आर्थिक स्रोताचा आम्हाला त्रास झाला नाही.
- शीतल शेटे-मोरे, गुरुवार पेठ
कोरोनाकाळात घरातील उत्पन्नावर अगदीच परिणाम झाला. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणावे लागले. यंदा मुलांना जुनी पुस्तके घेतली. गतवर्षीच्या अर्धकोऱ्या वह्याही यंदा वापरायला काढल्या. आर्थिक परिस्थिती हे त्याचे एक कारण असले तरीही यानिमित्ताने आर्थिक शिस्त लागायलाही मदत झाली.
-
गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या पेट्रोलच्या दरांचा विचार करता आम्ही गाडीचा वापर टाळायला सुरुवात केली आहे. कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर रस्त्याची रेकी करून आम्ही मार्ग निश्चित करतो. यातूनही एखादे काम राहिले तर चालत जाऊन हे काम करून येण्याची सवय लावली आहे.
- नीता शिंदे
.....