कऱ्हाड : कोरोना संक्रमणाने जनजीवन हवालदिल झालेले असताना जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्यामुळे सामान्यांचे ‘बजेट’ कोलमडले आहे. वाढलेला वाहतूक खर्च आणि कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती या दोन्हींचा परिणाम म्हणून ही दरवाढ झाली आहे. त्यातच ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदीचा गैरफायदा घेत रिटेल विक्रेतेही भाववाढ करीत आहेत.
इंधन दरवाढीचा वाहतुकीवर परिणाम होतो, आणि हीच दरवाढ इतर सर्व वस्तूंच्या दरावरही परिणाम करते. वाहतुकीचा खर्च वाढल्यानंतर तो खर्च भरून काढण्यासाठी मालाचे दर वाढविले जातात. होलसेल बाजारपेठेत वाढलेल्या दरापेक्षा रिटेल विक्रीत हे दर कित्येक पटीने वाढलेले असतात. गत काही महिन्यांत इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंच्या दरातही १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यातच सध्या कोरोना संक्रमण वाढले आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी आहे, तर शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला आहे. मुळातच निर्बंधांबाबत अद्यापही संभ्रम आहे. काय सुरू, काय बंद आणि कधी सुरू, कधी बंद याचा ताळमेळ लागेना. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यातच बाजारपेठेत दुकानांचे ‘शटर डाऊन’ झाले असून, सध्या फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. त्यावरही वेळेचे निर्बंध आहेत.
संक्रमण वाढल्यास निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र, या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही विक्रेत्यांनी आणखी जादा दराने किराणा मालाची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. आधीच वाढलेल्या महामागाईमुळे सर्वसामान्यांचे ‘बजेट’ कोलमडलेले असताना ‘लॉकडाऊन’च्या संधीचा फायदा घेत रिटेल विक्रेत्यांकडून सुरू असलेली मनमानी दरवाढ सामान्यांची डोकेदुखी ठरत आहे.
- कोट
गतवर्षी कोरोनाच्या कालावधीत वाहतूक व्यवसाय ठप्प होता. त्यानंतर वाहतूक सुरू झाली; मात्र इंधनाच्या दरात भरमसाट वाढ होत गेली. परिणामी वाहतूक खर्च वाढला आहे. सध्याही कोरोनाचे संकट असून, इंधन दरात झालेली वाढ आणि कोरोनाची महामारी या दुहेरी संकटांमुळे ट्रान्स्पोर्ट व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
- राजेंद्र मेहता, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक, कऱ्हाड
- चौकट (फोटो : ०८केआरडी०६)
डाळींच्या किमतीतही भरमसाट वाढ
डाळींच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तूरडाळ ९१ रुपये किलोवरून १०६ रुपये, उडीद डाळ ९९ वरून १०९, मसूर डाळ ६८ वरून ८० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. मूग डाळही १०३ वरून १०५ रुपये किलो झाली आहे.
- चौकट
तांदूळ महागणार!
भात हा सर्वसामान्यांच्या आहारातील अविभाज्य घटक आहे. मात्र, सध्या तांदूळ दरवाढीची चिन्हे असून १४ ते १५ टक्क्यांनी दरात वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
- चौकट
प्रतिकिलो बाजारभाव
तूरडाळ : १०० ते १२० रु.
मूगडाळ : १०० ते ११० रु.
हरभरा : ६० ते ७० रु.
तेल : १३० ते १४५ रु.
तांदूळ : २५ ते ५० रु.
गहू : २५ ते ४० रु.
ज्वारी : ३५ ते ४५ रु.
साखर : ३८ ते ४२ रु.
- चौकट
खाद्यतेलाचे दर (लिटरप्रमाणे)
तेल : जुना दर : सध्याचा दर
पामतेल : ८७ : १२१ रु.
सूर्यफूल तेल : १०६ : १५७ रु.
वनस्पती तेल : ८८ : १२१ रु.
तीळ तेल : ११७ : १५१ रु.
शेंगातेल : १३९ : १६५ रु.
सोया तेल : ९९ : १३३ रु.
फोटो : ०८केआरडी०५
कॅप्शन : प्रतीकात्मक