पळशी : माण तालुक्यातील पळशी गाव व परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना झपाट्याने पसरत होता. रोज नव्या रुग्णांची भर पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. गेल्या महिन्यात एकाच कुटुंबात अनेकजण बाधित आढळून आल्याने बाधितांची संख्या ७५ च्या आसपास पोहोचली होती. मात्र, वेळीच ग्रामस्थांनी काळजी घेत वाढणाऱ्या संख्येला लगाम घातला आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने ही संख्या ४० वर थोपवली आहे.
गेल्या महिन्यात पळशी गावात रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे लोक गाव सोडून रानात राहू लागले; पण आठवडाभरातच कोरोनाचा वाड्या-वस्त्यावरही शिरकाव वाढू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. माळीखोरा परिसरात रुग्ण संख्या दहाच्या आसपास पोहोचली. पण घाबरून न जाता प्रत्येक बाधिताने विलगीकरणात राहत प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले व उपचार घेतले. याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील सर्वांनीच कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला तेथेच आळा बसला. तर निगेटिव्ह अहवाल असूनही बाधितांचे कुटुंबीय इतरांशी होणारा संपर्क टाळून घरातच थांबले.
दरम्यानच्या काळात पळशी ग्रामपंचायतीने दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन केल्याने कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. याबरोबरच ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक दुकानदार, व्यावसायिकांची कोरोना टेस्टही करण्यात आली. यावेळी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना येथील जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवत योग्य उपचाराची सोय केली, त्यामुळे वाढणारी रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली.
याबरोबरच अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचेमार्फत पळशी गाव, वाड्या-वस्त्या व परिसरात सर्व्हे केला जात असून, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर गंभीर आजाराचे रुग्ण यांची तपशीलवार नोंद ठेवली जात आहे. पळशी परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून, भीतीमुळे मजुरीवरही कोणी जात नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असला तरी कोरोनाची साखळी तुटत असल्याने मजुरांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. वारंवार प्रशासनाच्यावतीने आवश्यक सूचना घरोघरी देण्यात येत आहेत.
(चौकट)
भीतीमुळे घराला कुलपे...
गाव परिसरात अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येत आहे. पण काहीजण भीतीमुळे घराला कुलपे लावून पसार होत आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामपंचायतीने सर्व्हेच्या वेळा सकाळी किंवा संध्याकाळी कराव्यात, अशी मागणी होत आहे
कोट...
परिसरातील लोकांनी तपासणी करण्यास घाबरू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. लवकरच गाव परिसरात तपासणी कॅम्प राबविण्यात येणार असून, त्यामुळे रुग्ण संख्या आणखी आटोक्यात येण्यास मदत होईल.
-एस. व्ही. जाधव, ग्रामसेवक, पळशी
फोटो
०५पळशी
पळशी (ता. माण) येथे शासनाने जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊनचे पालन केले जात असून, त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला लगाम बसला आहे.