प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बहुतांश लहान मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने ही चिमुरडी कोरोनाचे ‘सायलंट कॅरिअर’ म्हणून कुटुंबात वावरत आहेत. त्याचा धोका ज्येष्ठांसह त्यांच्या पालकांनाही बसत आहे. त्यामुळे मुलांमध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञ देत आहेत.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने वर्तविलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही साताºयात लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटरची उभारणीही सुरू केली आहे. लहान मुलांमध्ये आढळून येणारा कोरोना विषाणू गंभीर आजाराचे स्वरूप धारण करत नाही, ही बाब दिलासा देणारी आहे. एक दिवसाच्या बाळापासून वीस वर्षांच्या तरुणापर्यंत सर्वांनाच कोविडची लागण होण्याची शक्यता आहे. पण लक्षणे आढळून आल्यानंतर तातडीने निदान आणि सुयोग्य उपचार हे सूत्र कुटुंबाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
दुसऱ्या लाटेत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश वेळेला ही लागण घरातील लहान मुलांकडून पालकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घरात कोणत्याही वयाच्या मुलांना सर्दी, ताप, खोकला, उलट्या, जुलाब याचा त्रास झाला तर कुटुंबीयांनी त्याच्याकडे जाताना मास्कचा सक्तीने वापर करावा. लहान मुलांमध्ये कोरोना झाला तर तो बरा होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.
चौकट :
१. सातारच्या पोरांची रोगप्रतिकारशक्ती सक्षम
राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा पर्यावरणीयदृष्ट्या सातारा जिल्हा समृद्ध आहे. मर्यादित औद्योगिकरणामुळे येथे प्रदूषणाची पातळी मर्यादित आहे. निसर्गाने नटलेली वनराई, फास्टफुड खाण्यावर मर्यादा, खेळायला क्रीडांगण, बागडायला अंगण आणि प्रदूषणविरहित हवेमुळे मुलांमध्ये नैसर्गिकरित्या ‘इनेट’ अर्थात सक्षम रोगप्रतिकारशक्ती आढळते.
२. स्तनपानास अटकाव नकोच
काही कुटुंबांमध्ये स्तनदा मातांनाही कोविडची लागण झाली आहे. अशावेळी बाळाला कोविडची लागण होऊ नये म्हणून बाळाचे स्तनपान बंद केले जाते. वैद्यकीयशास्त्रानुसार हे चुकीचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते कोविडची लागण की स्तनपान यात प्राधान्य द्यायचं झालं तर स्तनपानाला द्यावे लागेल. त्यामुळे आवश्यक ते सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन बाळाला स्तनपान दिल्यास त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
३. कोरोनापश्चातही काळजी आवश्यक
कोरोना झाल्यानंतर महिना दीड महिन्यांनंतर मल्टिसिस्टीम इंफ्लेमेंटरी सिंड्रोमचा त्रास लहान मुलांना जाणवू शकतो. त्यात ताप येणे, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे, तोंड लाल होणे, रक्तदाब कमी होणे, हृदयावर ताण पडणे, आदी समस्या निर्माण होतात. मुलांना अशी लक्षणे असल्यास लगेचच उपचार करण्याची गरज असते. या आजारात स्टेरॉईड, इम्युनोग्लोबिन आणि अॅस्परिन औषधे घ्यावी लागतात.
पॉर्इंटर
या चिमुकल्यांना जपायची गरज!
जन्मत:च कमी वजन असलेले बाळ
सेलेबल पाल्सी रुग्ण
शस्त्रक्रिया झालेले
जन्मत:च व्यंग असलेले
कर्करोग असलेले
हृदयरोग असलेले
कोट :
कोणीही कितीही काळजी घेतली तरी कोविड होऊ शकतो ही मानसिकता करून घेणं गरजेचं बनलं आहे. लहान मुलांमध्ये आढळणारा कोरोना धोकादायक नाही. पण मुलांची सुश्रुषा करताना त्यांच्या पालकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
- डॉ. देवदत्त गायकवाड, बालरोगतज्ज्ञ
कोटला फोटो आहे