लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाविषयक कामकाज करताना जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय बाधित होत आहेत. अशा काळात त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या समित्यांच्या माध्यमातून संबंधितांना मदत करण्यात येणार आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, ‘जिल्हा परिषदेमधील कोरोना कामकाज करण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी हे अहोरात्र कामकाज करीत आहेत. परिणामी अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील, कुटुंबातील व्यक्तीसुद्धा बाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे समिती स्थापोचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रभावी उपाययोजना करणे व बाधित झालेल्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर वेळीच उपचार होण्याच्यादृष्टीने आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेतील कोरोनासंदर्भात कामकाज करीत असलेल्या अधिकारी अथवा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती बाधित झाल्यास त्यांना वैद्यकीय सोयीसुविधा पुरविण्याचे काम या समित्या करतील. जिल्हास्तरावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, सहायक प्रशासन अधिकारी नितीन दीक्षित हे या समितीचे सदस्य असतील.
तालुकास्तरावर हे कामकाज पाहण्यासाठी नेमलेल्या समितीचे गटविकास अधिकारी हे अध्यक्ष असतील आणि तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी हे या समितीचे सदस्य असणार आहेत, असे सांगण्यात आले.
दरम्यान, या समितीच्या मागणीप्रमाणे कोरोना केअर सेंटर तसेच डीसीएच आणि डीसीएचसी अर्थात कोविड हॉस्पिटलने तत्काळ बेड उपलब्ध करून द्यावेत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट :
जिल्हा परिषदेतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास त्यांना मदत होण्यासाठी समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार बेड, इतर वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\