माणिक डोंगरे
मलकापूर : शहरात आतापर्यंत एकूण २ हजार ५७७ बाधित झाले. त्यापैकी २ हजार ३६८ जणांनी कोरोनावर मात केली, तर ७१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे शहराचा मुक्ती दर कमी होऊन ९१.९ टक्क्यांवर खाली आला आहे. मृत्यूदर कमी होऊन २.८ टक्क्यांवर स्थिर आहे, तर सक्रिय रुग्णसंख्या वाढून ५.३ टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा मलकापूर शहरावरही थोडाफार परिणाम झालेला दिसत आहे.
मलकापुरात पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि शहरात टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत तर कोरोनाने कहर केला होता. ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमी-कमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी दोन-तीन जण, तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडले होते. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत बाधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता. शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे प्रमाण थांबलेले नव्हते. जानेवारी महिन्यात पुन्हा वाढ होत गेली. १५ जण बाधित आले. फेब्रुवारीमध्ये १९, तर मार्च महिन्यात ७७ रुग्ण वाढले. यापुढे जाऊन ३ एप्रिल ते ६ मे एका महिन्यात तब्बल ४५३ बाधित सापडले, तर १६ जणांचा मृत्यू झाला. त्यापुढे मे महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच राहिला. ११ जून अखेर ३५ दिवसांत तब्बल ५९२ जण बाधित सापडले होते. या १० जुलैअखेर या महिन्यात मे आणि जून महिन्याच्या तुलनेत थोडासा दिलासा मिळाला असला तरी ३३० जण बाधित सापडले असून, ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
मलकापुरात १४ महिन्यांचा लेखाजोखा
२२ एप्रिल ते २४ मे ३१, २५ मे ते २५ जून ०, २६ जून ते २६ जुलै ४३, २७ जुलै ते २६ ऑगस्ट ३३८, २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर ४२८, २७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबरला १५९, २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर ६९, २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १८, ३१ डिसेंबर ते ३० जानेवारी १५, ३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी १९, १ मार्च ते २ एप्रिल ७७, ३ एप्रिल ते ६ मे ४५३, ७ मे ते ११ जून ५९२, ११ जून ते १० जुलै ३३०.
चौकट
मलकापुरात सक्रिय रुग्ण पुन्हा शंभरीपार
एकूण- २५७७, मृत्यू - ७१, डिस्चार्ज - २३६८, उपचारार्थ - १३८, त्यापैकी रुग्णालयात - ३३, गृहविलगीकरण - ८२, विलगीकरण कक्षात २३.