म्हसवड : लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा १७ ते २७ एप्रिल या कालावधीत होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिंगणापूर यात्रेवर या वर्षीही कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. मात्र यात्रा भरण्याबाबत स्थानिक प्रशासनाने अद्यापपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने भाविकांसह स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांमध्ये शिंगणापूर यात्रेचा समावेश होतो. चैत्र शुद्ध पंचमी ते पौर्णिमा या कालावधीत भरणाऱ्या शिंगणापूर यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश, आंध्र, कर्नाटकमधून ७ ते ८ लाख भाविक येत असतात. दरवर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी तसेच कावडीप्रमुख, मानकरी भाविक यांची बैठक घेऊन यात्रेबाबत नियोजन केले जाते.
गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे देशभर पूर्णपणे लॉकडाऊन असल्यामुळे प्रशासनाने बैठक घेऊन शिंगणापूर यात्रा रद्द झाल्याचे जाहीर केले होते. या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने १७ ते २७ एप्रिल कालावधीत होणारी शिंगणापूर यात्रा भरणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यात्रा, जत्रांसह गर्दीच्या कार्यक्रमांवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. परंतु शिंगणापूर यात्रेबाबत स्थानिक यंत्रणेकडून अद्यापपर्यंत स्पष्ट निर्देश दिले नसल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शिंगणापूर यात्रा भरणार नसल्याचे संकेत मिळत असले तरी यात्रेच्या कालावधीत शंभू महादेव मंदिर किती दिवस बंद राहणार, यात्रेतील शंभू महादेव हळदी समारंभ, लग्नसोहळा, ध्वज बांधण्याचा सोहळा, कावडी सोहळा यासारख्या धार्मिक कार्यक्रमांसाठी किती सेवाधारी, मानकरी भाविकांना परवानगी मिळणार, यात्रा कालावधी दरम्यान गावातील दुकाने सुरू राहणार का, यात्राकाळात कोणते निर्बंध लावले जाणार, लाखो भाविकांना थांबवण्यासाठी प्रशासन, ग्रामपंचायत तसेच देवस्थान समितीच्या वतीने कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार याबाबतचे कोणतेही निर्णय स्थानिक प्रशासनाकडून अद्यापपर्यंत जाहीर केले गेले नाहीत.
शिंगणापूर यात्रा १५ दिवसांवर आली असून यात्रा भरण्याबाबत लाखो भाविकांसह यात्रेसाठी येणारे स्टॉलधारक, स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर यात्रा रद्द केल्यास लाखो भाविकांना थांबविण्यासाठी शिंगणापुरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करावी लागणार आहे. तसेच शिंगणापूर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता आहे. मराठवाड्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून येणारे प्रमुख मानकरी भाविक यात्रेसाठी गुढीपाडव्यापासून चालत निघत असतात. त्यामुळे या भाविकांना यात्रेच्या निर्णयाबाबत योग्य वेळेत निरोप जाणे आवश्यक आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रेबाबत स्थानिक प्रशासकीय यंत्रणा कोणते निर्देश देणार या प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट -
शिंगणापुरात म्हसवडची पुनरावृत्ती नको
शिंगणापूर यात्रा पंधरा दिवसांवर आली तरी प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली नाही. भाविक ग्रामस्थ यांच्यात संभ्रमावस्था असून प्रशासनाने वेळकाढूपणा करून ऐनवेळी आपला निर्णय घेऊ नये. तसे झाल्यास भाविकांत गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने वेळकाढूपणा सोडून जो काही निर्णय आहे तो लवकर द्यावा नाहीतर म्हसवड यात्रेत जे घडले त्याची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.