खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वच यंत्रणा व्यस्त आहेत. कोविडमध्ये काम करीत असलेले सर्वच लोक मग ते खासगी दवाखान्यांतील असोत वा सरकारी आरोग्य विभागांतील कर्मचारी. सर्व जण प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत. हजारोंच्या संख्येने असलेल्या रुग्णांना उपचार देताना सरकारी यंत्रणा तुटपुंजी पडू लागल्याने कोरोनाग्रस्तांना खासगी रुग्णालयांचा मोठा आधार मिळत आहे.
तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी सरकारी रुग्णालयासह खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आपले कर्तव्य बजावत आहेत. खाजगी दवाखान्यात वेळेला चांगल्या सुविधा आणि चांगले उपचार हवे असतात त्या वेळी पैसे भरावे लागतात. कारण कोट्यवधीची साधनसामग्री उपलब्ध करणे, इमारत, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांचा पगार व इतर खर्च खाजगी रुग्णालयांना चालविण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे येथे उपचारासाठी पैसे भरणे अनिवार्य आहे. या सर्वांचा मेळ घालून लोकांच्या आरोग्यासाठी खाजगी रुग्णालयांत उपचाराच्या सुविधा दिल्या जात आहेत.
खाजगी क्षेत्राला होणारा खर्च याची तुलना जर सरकारी खर्चाशी केली तर निश्चित सरकारी यंत्रणेवर अमाप पैसा खर्च केला जात असतो. पण, त्या मानाने खाजगी क्षेत्रासारखी सेवा कायमस्वरूपी सरकारी रुग्णालयात होताना दिसत नाही. आजही अनेक रुग्णालयांतील त्रुटी कोरोनाकाळात समोर येत आहेत.
(चाैकट)
खासगी डॉक्टरांचे योगदान
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये खंडाळ्यातील जगताप हॉस्पिटल येथे सर्व खाजगी डॉक्टरांनी मोफत सेवा देऊन त्या ठिकाणी काम केले होते. बंद पडलेले हॉस्पिटल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरवठा करून सुरू करण्यात आले. त्यामुळे किमान या ठिकाणी लोकांना सेवा मिळत आहे. दुसऱ्या लाटेत येथे डेडिकेटेड कोरोना सेंटर बनविल्याने लोकांची काही प्रमाणात सोय झाली आहे.
(कोट)
खाजगी रुग्णालय उभारणीसाठी कोटींमध्ये रक्कम खर्च करावी लागते. त्यासाठी प्रत्येक जण कर्ज घेत असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळत नसते. सर्व हयात कर्ज फेडण्यात जाते. खाजगी हॉस्पिटलमध्ये जास्त स्कोर असलेल्या रुग्णांना घेताना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते आणि व्हेंटिलेटर हे खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा एक किंवा दोनच उपलब्ध आहेत. या बेडवर त्याच रुग्णालयातील ॲडमिट झालेल्या रुग्णांना प्रकृती बिघडल्यानंतर उपचार करावे लागतात. अशा परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसताना जास्त स्कोरचा पेशंट घेऊन उपचार करणे शक्य होत नाही.
- डॉ. नितीन सावंत