सातारा: जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक असून मृत्यू झालेल्यामध्ये वृद्धांची संख्या मोठी आहे. नागरिक अंगावर आजार काढल्याने हे प्रमाण वाढत आहे. असा निष्कर्ष प्रशासनानेच काढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या मृत्यूने २५०० टप्पा ओलांडला आहे. तर चोवीस तासात नवे २३८३ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.
सातारा शहरात बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे. एकाच दिवशी ५१५ जण बाधित आढळून आले आहेत. शहरातील प्रामुख्याने मोजक्याच भागाला कोरोनाचा विळखा पडला आहे. करंजे, मंगळवार पेठे, राजसपुरा पेठेचा काही भागात कमी रुग्ण आढळून येत आहेत. तर शहरातील गोडोली, शाहूनगर या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५३ हजार ५० जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्दव झाले आहेत. कोणाच्या घरातील करता व्यक्ती तर कोणाच्या घरातील जेष्ठ व्यक्ती बळी गेल्याच्या घटना घडत आहेत. ब्रेक द चैनमुळे रस्ते ओस असले तरी त्या रस्त्यावरून रुग्णवाहिका सायरन वाजवत जाताना काळजात धडकी भरवून जात आहे. सातारा शहरात आतापर्यंत १२७ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यात कोरोना बळीं जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष करून शहरातील मध्यमवर्गीयाना कोरोनाने चांगले पिडले आहे. कोरोनाची साखळी काही केल्या तुटत नाही. मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन जीव तोड मेहनत घेत आहे.परंतु किरकोळ आजार अंगावर काढल्याने कोरोनाचा बळी पडण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. मृतांमध्ये सातारा तालुका नंबर वनला तर वाई तालुका द्वितीय नंबरला आहे. वाई तालुक्यात काही गावांमध्ये आणि वाई शहरात संसर्ग तुटत नाही.त्यामुळे बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोना मुक्तीचेही प्रमाण चांगले आहे. शनिवारी दिवसभरात १४४४ जण कोरोनातून मुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत ८३ हजार ८१९ जण जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लसीकरणामुळे युवकांमध्ये समाधान
सातारा जिल्ह्यात १८ वर्ष ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण मोहिमेला महाराष्ट्र दिनी प्रारंभ करण्यात आला. पहिल्या लसीचा मानकरी पाटण तालुक्यातील जळव गावचे सुपुत्र श्रीकांत खामकर हा युवक ठरला.आरोग्य उपसंचालक डॉ.संजोग कदम यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यामुळे युवकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरुवात करण्यात आले असून हे लसीकरण जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कराड, ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ, प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव येथे करण्यात आले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राम जाधव, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.प्रमोद शिर्के, निवासी वैधकीय अधिकारी डॉ.कारंजकर यांची उपस्थिती होती.