महाबळेश्वर : पाचगणीतील एका महिलेपाठोपाठ कासरूड येथील दोन महिलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली आहे. तालुका प्रशासनाने उपाययोजना राबवून दोन महिने कोरोनाला रोखून धरले होते. परंतु मुंबईकरांबरोबर महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.महाबळेश्वर, पाचगणी पर्यटनस्थळी मुख्य व्यवसाय पर्यटन आहे. यामुळे दोन शहरांबरोबरच तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून महसूल, पोलीस, पालिका, आरोग्य विभाग शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून योग्य ती खबरदारी घेत होते. प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळेच कोरोनाला महाबळेश्वर तालुक्यात प्रवेश करण्यात अपयश आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण आढळत असताना महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्तच राहिला होता. परंतु तालुक्यात तीन महिला कोरोना बाधित आढळून आल्याने इतर तालुक्यांप्रमाणेच महाबळेश्वर तालुकाही कोरोनायुक्त ठरला आहे.रोजंदारीसाठी जिल्ह्याबाहेर असलेल्या चाकरमान्यांनी तालुक्यात येण्याचा सपाटा लावला आहे. येथे ३६०० लोक परजिल्ह्यातून आले आहेत. यामध्ये मुंबईकरांचा भरणा अधिक आहे. तीन रुग्ण मुंबईवरून महाबळेश्वर तालुक्यात आले होते. मुंबईच्या गोरेगाव येथील कोयना वसाहतीत राहणाऱ्या बावीस जणांचा एक समूह मंगळवार, दि. १९ रोजी महाबळेश्वर येथे आला.
जिल्ह्याची सीमा असलेल्या कुंभरोशी नाक्यावर ट्रक अडविण्यात आला. तपासणीनंतर त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना पुन्हा पोलादपूरला पाठविण्यात आले. तेथे गेल्यानंतर सर्वांनी ट्रक पुन्हा मुंबईला पाठविला. तेथून ते सर्वजण पायी कुंभरोशीला आले. त्यांना पुन्हा प्रवेश नाकारल्याने ते दोन दिवस तेथेच राहिले. या काळात त्यांच्या नातेवाइकांनी जेवणाची सोय केली. दोन दिवसांनंतर सर्वजण कासरूड येथे पोहोचले.ही माहिती समजल्यावर प्रशासनाने सर्वांना गुरुवार, दि. २१ रोजी तळदेव येथील संस्थेत विलगीकरण केले.
यामधील वृद्ध महिलांना पूर्वीचे काही आजार होते, अशा चारजणांना कोरोना चाचणी करण्यासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी चारही जणांचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल शनिवारी मिळाला. यामध्ये दोन महिलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. दोन महिलांच्या संपर्कात आलेल्यांना सातारा येथे पाठविण्यात आले.मुंबईहून आलेल्यांसाठी तळदेवमध्ये स्वतंत्र कक्षमुंबईहून आलेल्यांना ठेवण्यासाठी तळदेव येथे स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. या गावातील कोणाचाही या लोकांशी संपर्क येत नाही, त्यामुळे तळदेवच्या ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. या कक्षात कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर कोणाच्याही संपर्कात येऊ दिले जात नाही. याबाबत प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत आहे, अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
ग्राम समिती मुंबईकराची योग्य काळजी घेत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश येईल. स्थानिकांनी घाबरून न जाता घरातच सुरक्षित राहावे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.- सुषमा चौधरी-पाटीलतहसीलदार