सातारा : कोरोनाग्रस्त आढळलेला परिसर (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) वगळून शहरातील संपूर्ण बाजारपेठ खुली करण्याचे आदेश प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिले आहेत. या आदेशामुळे शहरातील राजपथ, कर्मवीर पथ तसेच इतर मुख्य रस्त्यांवरील बाजारपेठ खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारपासून लॉकडाऊनच्या नियमांना शिथिलता दिली. मात्र प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सातारा शहरातील ६ प्रतिबंधित क्षेत्रे तसेच पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगरपालिका रस्ता ते राजवाडा, पोवई नाका ते शाहू स्टेडियम रस्ता, पोवई नाका ते शाहू स्टेडियम रस्ता, एसटी बसस्थानक ते राधिका चौक, पोवई नाका ते पोलीस मुख्यालय मार्गे मोती चौक या रस्त्यांवरील बाजारपेठ खुली झाली नव्हती.
आता या रस्त्यांवरील सर्व प्रकारची दुकाने उघडण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ खुली होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणेच प्रांताधिकाऱ्यांनीही आपल्या आदेशात उल्लेख केलेला आहे. सकाळी ९ ते ५ यावेळेत बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवता येतील.दुकानांमध्ये अनावश्यक गर्दी होऊ न देण्याची काळजी व्यापारी वर्गाने घेणे आवश्यक आहे. दरम्यान, प्रतापगंज पेठ, गार्डन सिटी, सदरबझार, गेंडामाळ या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने या भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केली असून या ठिकाणी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने ज्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत, ते सर्व नागरिक, व्यापारी यांनी पाळणे आवश्यक आहे. सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे, सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.नियम न पाळल्यास परवाना रद्ददुकानामध्ये प्रत्येक ग्राहकात किमान ६ फूट अंतर राहील, याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. ५00 दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास रु. १000 दंड आकारण्यात येईल. व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.