सातारा : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात कारोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत एकही बाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे सातारकरांसाठी दिलासा मिळाला. तर पूर्वी दाखलपैकी १५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून नव्याने ७७ जणांना संशयावरुन दाखल करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत चालला होता. काही दिवसांपूर्वी ऐका-ऐका दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. एका दिवशी तर २५ जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले होते. आतापर्यंतचा जिल्ह्यातील हा उच्चांक ठरला होता. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे कऱ्हाड मधील होते.
असे असलेतरी गेल्या पाच दिवसांत कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. दोन, तीन, पाच असे रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी दिवसभरात एकही रुग्ण सापडला नाही. गुरूवारी दुपारपर्यंतही एकाचाही अहवाल पॉझीटिव्ह आला नव्हता. त्यामुळे सातारकर आणि प्रशासनासाठीही हा दिलासाच ठरला आहे.दरम्यान, पूर्वी कोरोनाच्या संशयावरुन दाखल असणाऱ्या १५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामध्ये दिवंगत क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील ५०, कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ७७, कृष्णा मेडिकल कॉलेज २, वाई ग्रामीण रुग्णालय ७, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील १४ जणांचा समावेश आहे.जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ७७ संशयितांना दाखल केले आहे. यामध्ये बुधवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात ८, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ६९ जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.