नसीर शिकलगारफलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला उठाव नाही. फळे व भाजीपाला अक्षरश: रानात सोडून द्यावा लागला आहे. अशा परिस्थितीत फलटण पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पवारवाडी येथील शेतकरी सचिन ऊर्फ बाबा वरे यांच्या कलिंगड व टरबूज तर आसू येथील शिवाजीराव शेडगे यांच्या कोबी पिकाचे नुकसान झाले आहे. गोखळी, पवारवाडी, मुंजवडी येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाबा वरे या युवकाने जानेवारीत ८० गुंठ्यात आठ प्रकारच्या कलिंगड व टरबुजाची लागवड केली.
दोन एकरांत लागवड करून दोन लाख रुपये खर्च केला. २२ मार्च रोजी ही फळे तोडणीला आली अन् कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊन केला. त्यामुळे त्यांना देशी-विदेशी बाजारपेठ मिळू शकली नाही.बांधावर विक्री करूनही भांडवलही निघाले नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. खचून न जाता लॉकडाऊन जूनमध्ये उठेल, अशा आशेने आणि किमान भांडवल तरी मिळावे, या उद्देशाने त्यांनी त्याच गादी वाफ्यावर पुन्हा कलिंगडाची लागवड केली.
जूनमध्येही लॉकडाऊन उठले नसल्याने पुन्हा बाजारपेठेअभावी घोर निराशा झाली. सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचे वरे सांगतात. यावेळेस मात्र त्यांनी ग्रामीण भागाबरोबरच बारामती, फलटण शहरातील चौकाचौकात फळे विकण्याचा संकल्प केला आणि त्याची सुरुवातही तीन दिवसांपासून केली आहे. परंतु आधुनिक पद्धतीच्या या कलिंगडाला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही.आसूचे शिवाजीराव शेडगे यांनी उसाच्या एक एकरात आंतरपीक म्हणून कोबीचे पीक घेतले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्याही कोबीला बाजारपेठेअभावी उठाव मिळाला नाही. परिणामी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेडगे यांनीही संपूर्ण एक एकराचा प्लॉट रोटर करून जमिनीत गाडला. त्यांचेही सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शेडगे यांनी केली आहे.