पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी पिंपोडे बुद्रुक व परिसरातील खत विक्री दुकानांना अचानकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी तसेच खत विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्ह्यात खतांचा तुडवडा पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.सद्य:स्थितीत परिसरातील शेतकरी खरीप पूर्व पेरणीच्या कामात मग्न आहेत. याचबरोबर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर पिकांना खते देण्याच्या कामांना वेग आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे तर काही ठिकाणी विक्रेत्यांच्या कृत्रिम खत टंचाईमुळे शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नसल्याची तक्रार होत होती.
खतांचा तुटवडा भासल्याच्या काही तक्रारी कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्याकडे गेल्याने कृषी सभापती धुमाळ यांनी पिंपोडे बुद्रुक व वाठार स्टेशन येथील खतांच्या सर्व दुकानांना, खरेदी-विक्री संघाला अचानकपणे भेट दिली तसेच परिस्थिती जाणून घेतली.कृषी सभापतींच्या अचानक भेटीमुळे विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी मोहीम अधिकारी, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी उपस्थित होत्या. कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या.यावेळी कृषी सभापती मंगेश धुमाळ सर्व खते विक्रेत्यांनी पॉज मशीनचा वापर करावा म्हणजे खत कंपन्या विक्रेत्यांना गरजेप्रमाणे खत उपलब्ध करून देतील, अशी सूचना त्यांनी दिली.
दरम्यान कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी कोरोना विषाणू संसर्ग आपत्ती काळातही तळागळापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत ग्राऊंड रिपोर्ट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यात जवळपास ३५ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे आणि येणाऱ्या काही दिवसांत १७ हजार मेट्रिक टन खत मंजूर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे खतांचा तुटवडा भासणार नाही.- मंगेश धुमाळ,कृषी सभापती, जिल्हा परिषद सातारा.