महाबळेश्वर : राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून महाबळेश्वर येथे बंगल्यात हवापालटासाठी एक कुटुंब आले होते. निसर्गाचा आनंद लुटताना बुधवारी सायंकाळी विल्सन पॉर्इंटवर ते घोडेसवारी करत होते. यावेळी घोड्यावरून पडल्याने नऊ वर्षांचा मुलगा व घोडेवाला जखमी झाला. या प्रकरणाकडे वन विभाग व पोलीस विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.देशात लॉकडाऊन सुरू आहे. विनाकारण कोणीही बाहेर पडू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. तरीही काहीजण येथील निसर्गाचा आनंद लुटण्याचा मोह आवरू शकत नाहीत. येथील विल्सन पॉर्इंटवर काही धनिकांचे बंगले आहेत.
या बंगल्यात अनेक दिवसांपासून धनिकांचे कुटुंब राहत आहेत. या धनिकांच्या मुलासाठी काही दिवस घोडेसवारीची सोय केली होती. तीन ते चार दिवस दोन घोडे या मुलांच्या मनोरंजनासाठी विल्सन पॉर्इंटवर येत होती. या बंगल्यातील धनिकांची लहान मुले बुधवारी सायंकाळी घोडेसवारीचा आनंद लुटत होती. परंतु दोन दिवसांपूर्वी घोडे मालकाने लहान मुलाला घोड्यावर बसविले होते. तो स्वत:ही त्या घोड्यावर बसला होता.दोघांना घेऊन तो घोडा भरधाव धावत होता. अलीकडेच येथे वनविभागाने डांबरी रस्ता तयार केला आहे. या डांबरावरून घोड्याचे पुढील दोन्ही पाय घसरले. यामुळे घोड्यावर बसलेला लहान मुलगा व घोडेस्वार पडल्याने गंभीर जखमी झाले.
याच पॉर्इंटवर काहीजण फिरण्यासाठी आले होते. आवाज ऐकून ते घटनास्थळाकडे धावले. त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले. दोन दिवसांमध्ये याप्रकरणी कसलाही गुन्हा दाखल झालेला नाही.