खंडाळा : कोरोना विषाणूच्या भयावह संकटात स्वत:चे घर सोडून परजिल्ह्यात अनेक लोक अडकून पडले आहेत. सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे.
खंडाळा तालुक्यातील अनेक मेंढपाळ कबिल्यासह कोकण प्रांतात अडकले आहेत. त्यांना स्वगृही परतण्याची ओढ लागली आहे. पुन्हा गावी येण्यासाठी कोणत्याही अडचणी राहू नयेत, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.खंडाळा तालुक्यातील अनेक गावांतील मेंढपाळ आपल्या कुटुंब कबिल्यासह दरवर्षी कोकणात बकरी घेऊन जातात. दिवाळीपासून साधारण सहा महिन्यांच्या कालावधीत हे सर्वजण कोकण प्रांतात राहतात. मे महिन्याच्या अखेरीस तेथील चारापाणी संपुष्टात येऊ लागताच ते पुन्हा आपापल्या गावी परततात.
या वर्षीही अनेकजण कोकणात गेले आहेत. मात्र, मार्चपासून राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरू झाल्याने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केला. त्याचबरोबर जिल्हाबंदीचे आदेश जाहीर झाल्याने अनेक कामगार, मजूर तसेच मेंढपाळ परजिल्ह्यात अडकले आहेत.वास्तविक कोकणातही चारापाणी संपुष्टात येऊ लागल्याने या सर्व मेंढपाळांना परतीचे वेध लागले. सरत्या मे अखेर कोकणात पावसाचे वातावरण होते. त्यामुळे पावसापूर्वी तेथून निघणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्याची सीमा ओलांडून येण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मेंढपाळ व त्यांचे गावाकडील नातेवाईक हतबल झाले आहेत.
मेंढपाळांचा ही अडचण कानावर येताच आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी या प्रश्नाबाबत चर्चा केली. या लोकांच्या अडचणीबाबत तातडीने मार्ग काढण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात आला. त्यामुळे मेंढपाळांच्या परतीचा मार्ग खुला होणार आहे
वाई मतदारसंघातील जे मेंढपाळ कोकणातील जिल्ह्यात आहेत. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून त्यांची परवानगी घेऊन त्यांना सीमेवरून सोडण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. कोणाचीही अडचण होऊ नये, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच सर्व मेंढपाळांना घरी परत येण्याचा मार्ग मोकळा होईल.-मकरंद पाटील, आमदार