सातारा : लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरात बेकायदा आलेल्या वाधवान बंधूंना गुरुवारी सकाळी सातारा पोलीस अटक करणार आहेत. पाचगणी येथे क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या वाधवान बंधूंचा १४ दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी बुधवारी सायंकाळी संपणार आहे. त्यामुळे सातारा पोलिसांच्या हालचाली आता वाढल्या आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, बँकांच्या घोटाळ्याचे आरोप असलेले वाधवान बंधूं काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याच्या पत्रावर महाबळेश्वर पोहोचले. लॉकडाऊन असतानाही या वाधवान बंधूंसह २३ जणांचा ताफा महाबळेश्वरात आल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ वाधवान बंधूंसह त्यांच्या चमुला ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी वाधवान बंधूंवर गुन्हाही दाखल केला. त्यानंतर चौदा दिवसांच्या क्वॉरंटाईनमध्ये त्यांना ठेवण्यात आले. दि. २२ रोजी सायंकाळी या बाधवान बंधूंचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपत आहे. त्यामुळे सातारा पोलीस दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना ताब्यात घेणार आहे.वाधवान बंधूंवर असलेल्या आरोपाबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सीबीआयशी पत्रव्यवहार केला आहे. पूर्वीच्या गुन्ह्यासंदर्भात सीबीआय निर्णय घेणार आहे. मात्र, सीबीआयबला त्यांना ताब्यात घेण्यासाठी विलंब झाला तर या बंधूंचा होम क्वॉरंटाईनचा कालावधी वाढविला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वाधवान बंधूंना मुक्त केले जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.