सातारा : कोरोनाच्या महामारीत देखील शेतकरी आपल्या शेतात घाम गाळून अन्नधान्य पिकवत आहेत. त्यांनी उत्पन्न घेतले म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याची कमतरता पडलेली नाही. जिद्दीला सलाम करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवारी शिवारात जाऊन उभे राहिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना योद्धा असे संबोधत त्यांच्याविषयीची कृतज्ञता बांधावर जाऊन व्यक्त करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्या
नुसार सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतात जाऊन शेतकऱ्याची विचारपूस केली तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेऊन कोरोनाच्या लढ्यात नुकसान सोसून देशातील नागरिकांना अन्नधान्य पुरविले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या कार्याविषयी त्यांना सलाम केला. तसेच आपल्या देशातील १३० कोटी जनता ही शेतकऱ्यांच्या जीवावर अवलंबून आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचे मोल जाणून काम करावे, असे आवाहन शेतकऱ्याना केले.