म्हसवड : भालवडी येथे मुंबईहून आलेल्या एका कुटुंबातील वृद्धाचा रविवारी सायंकाळी होम क्वॉरंटाईनमध्ये असताना मृत्यू झाला. गावी आल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याने मृताच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. फलटण येथून तपासणीनंतर मृतदेह सोमवारी दहिवडीला पाठवण्यात आला. दहिवडी नगरपंचायतीच्या स्मशानभूमीत मृतदेहावर प्रशासनानाच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत माहिती अशी की, मूळचे भालवडी येथील असलेले मृत वृद्धासह त्यांची पत्नी, मुलगा व सून असे चारजणांचे कुटुंब मुंबई येथे राहत होते. हे चौघेजण शुक्रवार, दि. २२ रोजी भालवडी या मूळ गावी आले होते. मुंबई येथून आल्याने प्रशासनाने संबंधित कुटुंबातील सर्व व्यक्तींना होम क्वॉरंटाईन केले होते. गावी आल्यानंतर दोनच दिवसांत यातील वृद्ध व्यक्तीचा रविवारी अचानक मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत व्यक्ती तीन महिन्यांपासून काविळीच्या आजाराने त्रस्त होती. सततच्या आजारामुळे गेल्या आठवडाभरापासून पोटात पुरेसा आहार न घेतल्याने प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याचे मयत व्यक्तीच्या मुलाने ग्रामस्थांना सांगितले.दरम्यान, मुंबईहून आलेल्या वृद्धाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती सरपंच सुनीता पवार व पोलीस पाटील देवेंद्र बनसोडे यांनी आरोग्य विभागास दिली.
मृत व्यक्ती मुंबईहून आल्याने त्याला कोरोनाचे लक्षणे आहेत किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माण तालुका आरोग्य आधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी दिली होती.फलटण येथे मृतदेहाची तपासणी झाल्यावर मृतदेह माण प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. प्रशासनाने दहिवडीत नगरपंचायतीच्या स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्कार केले आहेत; पण हा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अहवाल आल्यावर स्पष्ट होणार आहे.