आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात भोपळ्याचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा उत्पादनही चांगले झाले असताना वेगळेच संकट उभे राहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळात बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे हजारो टन भोपळा पडून राहिला. शेतकऱ्यांनी शेवटी हा भोपळा जनावरांना घालावा लागत होते.फलटण तालुक्याचा पश्चिम भागात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. शेतकरी नवनवीन पिकांचे प्रयोग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पांरपरिक शेतीला फाटा देत तरुण वर्ग शेतीकडे वळला आहे.रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. विविध पीक पद्धतीकडे वळला आहे. त्याप्रमाणे भोपळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहेत. भोपळ्याला आंतर मशागत व औषधाचा खर्च कमी प्रमाणात होत असतो. तोडणी व वाहतुकीचा खर्च जादा असला तरी दर चांगला असतो. त्यामुळे गत वर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने इतर पिकांपेक्षा हिंगणगाव, आदर्की परिसरात मोठ्या प्रमाणात भोपळ्याची लागवड केली.एप्रिल-मे महिन्यांत भोपळा परिपक्व होऊन शेतकऱ्यांनी काढला; पण लॉकडाऊनमुळे भाजी मार्केट बंद राहिल्याने मे महिन्यात शेतकऱ्यांनी भोपळा तोडून झाडाखाली सावलीला ठेवला; पण एकाच ठिकाणी महिनाभर राहिल्याने खराब होऊ लागला.
त्यामुळे शेतकऱ्यांनी मेंढ्या व जनावरांना भोपळ्याच्या फोडी करून चारा म्हणून घालण्यास सुरुवात केली आहे. पण भोपळा पीक मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी ओढ्यात फेकून देण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.