योगेश घोडकेसातारा : देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा सर्व क्षेत्रात परिणाम झाला आहे. सातारा भौगोलिकदृष्ट्या सधन जिल्हा समजला जातो. शेतकऱ्यांनी पशुधन मोठ्या प्रमाणावर सांभाळले आहे. जनावरांना ते पोटच्या पोरापेक्षा जास्त जपत असतात. थोडं काही झालं तरी पशुचिकित्सा केंद्रात घेऊन जातात. लॉकडाऊनच्या काळात जनावरे दवाखान्यात नेणे धोक्याचे आहे. त्यामुळे जनावरांचे डॉक्टरच शिवारापर्यंत जात आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे आस्थापना, अनेक सरकारी कार्यालयाचे कामकाज थांबले आहे. मात्र, पशुवैद्यकीय अधिकारी पहिल्या दिवसापासून जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावोगावी फिरत आहेत. जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाखांहून अधिक आहे. या सर्वांची काळजी घेणारे हे अधिकारी सरकारच्या सूचनांचे पालन करीत कर्तव्य बजावत आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदीमुळे आवश्यक सेवा बघून बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये पाच टक्के कर्मचारी वर्ग घेऊन कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या अत्यावश्यक सेवेच्या यादीमध्ये पशुसंवर्धन विभागाचे नाव अधिकृतरित्या नाही. तरीसुद्धा पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पशुपालकांना व पशुधनाला सेवा सुरळीतपणे पुरवित आहेत.लॉकडाऊनच्या काळात पशुधनाच्या आरोग्याच्या काळजीसाठी शासनाने पशुवैद्यकीय सेवा सुरू ठेवाव्यात, असे निर्देश दिले. त्यानुसार पशुवैद्यकीय सेवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील पशुधनास तत्परतेने पोहोचवत आहेत. अशा सेवा पुरविताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कोरोना विषाणू संसर्ग पशुवैद्यकाला होऊ नये म्हणून स्वत: योग्य ती काळजी घेत आहेत. तरीसुद्धा पशुवैद्यकांचा संपर्क कार्यक्षेत्रातील पशुपालकांशी थेट संपर्क होत असतो.
त्या अनुषंगाने पशुवैद्यकांच्या कुटुंबाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठी शासनाने जीवाची हमी घेणे गरजेचे आहे. तसेच संसर्ग होऊ नये म्हणून हात वारंवार साबणाने धुणे, तोंडा व नाकाला मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्स ठेवून पशुवैद्यकीय सेवा चालू आहे.पशुधननुसार संख्या.
- गाय वर्ग व म्हैस वर्ग ७,३०,१०६
- शेळी- ३,०९,०११, मेंढी- २,६४,२२१
- कुक्कुटपालन २७,६५,४७७
दवाखान्याची संख्या
- जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने १९३
- जिल्हा पशु सर्व चिकित्सक १
- तालुका लघूपशु चिकित्सक ५
- पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक - ६१