वाठार स्टेशन : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असताना साताऱ्यातील एका पशुखाद्य कारखान्यात काम करणारे मध्यप्रदेशातील कामगार पायी हजारो मैल प्रवास करत आपल्या घराकडे निघाले होते. ते वाठार स्टेशनमध्ये आले असता तेथील ग्रामस्थांची माणुसकी या मजुरांसाठी धावून आली. जवळपास ३२ मजुरांची या ग्रामस्थांनी जेवणाची व त्यांच्या घराकडे परत जाण्याची व्यवस्था केली.याबाबत माहिती अशी की, सातारा-लोणंद रस्त्यावरून मध्यप्रदेशाकडे ३२ कामगार पायी निघाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना फलटण कोरेगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, सरपंच ऋषी जाधव यांना समजली. त्यांनी तत्काळ या सर्वांना वाग्देव चौकातील वाग्देव हायस्कूलमध्ये थांबवले.वाठारचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्याशी संपर्क साधला. घोंगडे यांनी कोरेगाव प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांना याबाबत माहिती दिली. यावेळी कीर्ती नलावडे यांनी सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत सांगून त्यांनी या सर्वांसाठी कोरेगाव आगाराच्या दोन स्वतंत्र एसटी बस उपलब्ध करून दिल्या.
अडकून राहिलेल्या या सर्व कामगारांना सायंकाळी सात वाजता जेवण, पाणी दिले. यावेळी सामाजिक अंतर पाळण्यात आले. सर्व नियम पाळत या बसमधून त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी वाठार ग्रामस्थांनी त्यांना निरोप दिला.यावेळी सरपंच ॠषी जाधव, शिवसेना नेते अमोल आवळे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, कोरोना समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सुमित चव्हाण, प्रवीण काळोखे उपस्थित होते.ठेकेदार गेला गावाकडे निघूनकोरोनाच्या धास्तीमुळे सर्वच जण भयभीत आहेत. साताºयातील एका कंपनीत पंधरा वर्षे काम करणाºया मजुरांचा पोशिंदा ठेकेदार त्यांना वाºयावर सोडून गावाकडे निघून गेला. यामुळे पोरके झालेले ३२ कामगार घरच्या ओढीने हजारो मैल पायी निघाले होते. मात्र समर्थ वाग्देव महाराजांच्या पवित्र भूमीत त्यांना देवासारखी माणसं भेटली. त्यामुळे वाठारकरांचा निरोप घेताना आणि एसटी बसमध्ये चढताना प्रत्येक कामगाराने एसटीच्या पायरीला नमस्कार करूनच प्रवेश केला.