सायगाव (सातारा) : दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या पोटच्या मुलावर लॉकडाउन काळात औषधोपचार करता आले नाही... त्यातच त्याचा मृत्यू झाला; पण दुर्दैवी बाब म्हणजे हे माहीत असूनही कोरोनाच्या धास्तीने गावकरी गावाबाहेर काढतील, या भीतीने तब्बल तीन दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. दुर्गंधी सुटल्याने रविवारी ही घटना उघडकीस आली. आर्यन जयवंत दळवी (वय १५, रा. म्हाते खुर्द,ता.जावळी जि.सातारा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.ही खळबळजनक घटना जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथे घडली. आर्यन हा आई -वडील व मोठ्या भावासह भांडुप- मुंबई येथे राहत होता. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर हे सर्वजण २२ मार्चला त्यांच्या मूळ गावी म्हाते खुर्द ला आले. आर्यन हाएका दुर्धर आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर उपचारदेखील सुरूहोते. मात्र कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आर्यनच्या कुटुंबीयांना उपचारासाठी आर्यनला कुठेच नेता आले नाही. या आजारानेच त्याचा मृत्यू झाला.आर्यनचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झालेला असतानाही कोरोनाच्या धास्तीने गावकरी गावाबाहेर काढतील या भितीने त्याचा मृतदेह घरातच ठेवला गेला. मृतेदहाची दुर्गंधी येवू लागल्याने गावातल्याच काही नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेढा येथे पाठविला. शवविच्छेदनानंतर या मुलाच्या मृतदेहावर म्हाते खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान या मुलाच्या आई- वडिल व भावाचे रायगाव (ता.जावळी ) येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.कोरोनाचा रुग्ण आढळल्याने घेतली भीतीजावळी तालुक्यातील निझरे आणि म्हाते या गावातील दोघेजण मुंबईहून एकत्रित प्रवास करून आले होते. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे म्हाते खुर्द आणि म्हाते मुरा ही दोन्ही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबरच ही गावे सीलही करण्यात आली होती. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. एखादी व्यक्ती जरी घराबाहेर पडली तरी त्यांच्यावर पोलीसांकडून कारवाई होत होती. दळवी कुटुंबही घरातच होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबाबत लोकांना कायम उत्सुकता लागून राहिेलेली होती. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांनी घराबाहेर पडणेच टाळले. मुलाचा मृत्यू झाला तरी ते घराबाहेर आलेच नाहीत. एवढी भीती त्यांनी घेतली होती.
CoronaVirus News in Satara : कोरोनाच्या भितीने मृतदेह तीन दिवस घरात, दुर्गंधी सुटल्याने उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 2:04 AM